कंधार : कंधार–बारूळ–नरसी मार्गे तेलंगणा आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या राज्यमार्गाची दुरवस्था यंदाच्या पावसाळ्यातही कायम राहणार असल्याचे चित्र आहे. कंधार तालुक्यातील मानसपुरी, बाचोटी, गोगदरी, बामणी फाटा आणि बारूळ परिसरातील पुलांची उंची अत्यंत कमी असल्याने दरवर्षी अगदी लहान-मोठ्या पावसातही हे पूल पाण्याखाली जातात. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटतो आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. (kandhar barul narsi state highway road problem rainy season)
Land Titling Act Maharashtra। जमीन व प्रॉपर्टी वादांना ब्रेक? महाराष्ट्रात येतोय नवा कायदा
स्वातंत्र्य मिळून दशकानुदशके उलटली, मात्र या मुख्य मार्गावरील पूल व रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च आहे. रुंदीकरण, मजबुतीकरण आणि पुलांची उंची वाढवण्याची कामे केवळ कागदोपत्रीच राहिल्याने हा राज्यमार्ग आहे की ग्रामीण भागातील एखादा दुर्गम रस्ता, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर एक ते दोन दिवस वाहतूक पूर्णपणे ठप्प राहते. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी वर्गाला बसतो. विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच स्पर्धा परीक्षांनाही मुकावे लागते. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पिकांचे नुकसान वाढते. काहीवेळा जीवघेण्या प्रवासामुळे अपघात आणि दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.
कंधार उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार पुरहानीची माहिती देऊनही मानसपुरी येथील पुलाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. बाचोटीजवळील गोगदरी आणि बारूळ येथील पुलांना मंजुरी मिळाली असली तरी निधीअभावी ठेकेदारांनी कामे अर्धवट स्थितीतच थांबवली आहेत.
बारूळ–तेलूर फाटा जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता मार्च अर्थसंकल्पात मंजूर झाला असून तो सध्या निविदा प्रक्रियेत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुमित पाटील यांनी दिली आहे.
पूरग्रस्त निधी, नाबार्ड आणि आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत ही कामे पूर्ण करण्याची आश्वासने प्रशासनाकडून वारंवार दिली जात असली, तरी प्रत्यक्षात कामांचा वेग अत्यंत संथ आहे. पावसाळा अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना यंदाही कामे पूर्ण होण्याची शक्यता धूसर दिसत आहे.
तहसीलदारांचे टेन्शन वाढले ; कलम 155 गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही
यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, कर्मचारी आणि वाहनचालकांना पुन्हा एकदा पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरवर्षीची ही समस्या लक्षात घेता लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून पूल व रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अन्यथा संतप्त नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

