पुणे : पुणे आणि परिसरातील जमिनींच्या बाजारभावात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाल्यानंतर सुमारे सहा वर्षांपूर्वी झालेल्या जमीन व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. १२.४० कोटी रुपयांच्या कर्जाच्या व्यवहारात बेकायदा कर्जपुरवठा, अवाजवी व्याज आकारणी आणि बनावट विक्रीखताद्वारे मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ‘तीर्थ रिअल्टी’चे बिल्डर विजय रौंदळ यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, जमिनीचे बाजारमूल्य प्रचंड वाढल्याने पूर्वी स्वेच्छेने झालेला व्यवहार रद्द करून जमीन परत मिळवण्यासाठीच ही तक्रार करण्यात आल्याचा दावा रौंदळ यांच्या बाजूने करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, १२.४० कोटी रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीपोटी व्याजासह तब्बल ६०.७८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच कर्ज व्यवहारातील कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा बनावट विक्रीखताच्या माध्यमातून संबंधित मालमत्तेवर हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
रौंदळ यांच्या बाजूने करण्यात आलेल्या दाव्यानुसार, कोविड-१९ महामारीच्या काळात ‘गोयल ग्रुप’ आर्थिक अडचणीत असताना संबंधित जमीन खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्यात आली होती. हा व्यवहार होऊन सुमारे सहा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात पुणे शहर आणि परिसरातील जमिनींच्या बाजारभावात मोठी वाढ झाली. त्यामुळे वाढलेल्या बाजारमूल्याचा फायदा घेण्यासाठी पूर्वी झालेला जमीन व्यवहार रद्द करून जमीन पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रौंदळ यांच्या बाजूने करण्यात आला आहे. रौंदळ यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारासंदर्भात यापूर्वी बंडगार्डन, खडक आणि बावधन पोलीस ठाण्यांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. संबंधित यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्या तक्रारी निकाली काढण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

