पुण्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणार – सचिन अहिर

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सोमवारी पुणे दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम पुणे श्रमिक पत्रकार संघाला भेट देत नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार केला. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही त्यांची भेट घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारितेची लोकशाहीतील भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण सदैव सकारात्मक राहू आणि आवश्यक ते सहकार्य करू, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

 

पुणे हे पूर्वी संपर्कप्रमुख म्हणून आपले ‘होम ग्राउंड’ असून येथील पत्रकारांशी अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे ही अहिर यांनी नमूद केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना भवन, मध्यवर्ती कार्यालय येथे भेट देऊन शहरातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. राज्यभर सुरू असलेल्या मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त्या, पक्षबांधणी, शाखा स्तरावरील संघटन विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे नियोजन आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना अहिर म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील शिवसैनिकांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रशासकीय कामे व्हावीत, यासाठी पदाधिकाऱ्यांच्या कार्याची सकारात्मक शिफारस करण्यात येईल. तसेच विधान परिषद कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लावली जातील. यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुणे शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत प्रत्येक पदाधिकाऱ्याने तळागाळापर्यंत पोहोचून पक्षविस्तारासाठी जोमाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर अहिर यांनी विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या दौऱ्यात शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, अजय भोसले, उपनेत्या सुलभा उबाळे, महिला आघाडी, युवासेना तसेच शिवसेनेच्या विविध संलग्न संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांची तयारी, मतदार पुनर्निरीक्षण मोहीम आणि नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Local ad 1