पोर्शे प्रकरणातील अनीशच्या पालकांचा सवाल; ‘माफीने मुलगा परत येणार नाही’
मृत अनीश अवधियाच्या आईचा सवाल ; पालकांची फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणी
पुणे, दि. ३ सप्टेंबर : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर अनीश अवधिया याच्या आई-वडिलांनी पुणे पोलिस, प्रसारमाध्यमे आणि पुणेकरांचे आभार मानताना प्रकरणाची सुनावणी तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणी केली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन आरोपींना कायद्याचा गैरफायदा मिळू नये, यासाठी १६ वर्षांवरील आरोपींबाबत कायद्यात कठोर तरतुदी करण्याची मागणी अनीशचे वडील ओम अवधिया यांनी केली.
मध्य प्रदेशातून पुण्यात आलेल्या अनीशच्या आई-वडिलांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.
अनीशच्या वडिलांनी सांगितले की, या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने सातत्याने आवाज उठविला. प्रसारमाध्यमांनी प्रकरणातील अनेक बाबी समोर आणल्या. तसेच कल्याणीनगर सह पुणेकरांनी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
‘केस अद्याप ट्रायलवर आलेला नाही’
न्यायालयीन प्रक्रियेबाबत कुटुंब समाधानी असल्याचे सांगत ओम अवधिया म्हणाले की, मात्र ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा संथ सुरू आहे. आरोपींच्या जामिनासह विविध कायदेशीर प्रक्रियेत बराच वेळ गेला असून, प्रकरण अद्याप प्रत्यक्ष सुनावणीपर्यंत पोहोचलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करून जलद सुनावणी घ्यावी आणि कुटुंबाला लवकर न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘१६ वर्षांनंतर गंभीर गुन्ह्यांसाठी कायदा कडक करा’
अल्पवयीन आरोपींच्या संदर्भातील कायद्यात बदल करण्याची मागणीही अनीशच्या वडिलांनी केली. ते म्हणाले की, सध्या १५-१६ वर्षांच्या मुलांकडूनही गंभीर गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी वयाची मर्यादा आणि कायदेशीर प्रक्रियेचा सरकारने गांभीर्याने पुनर्विचार करावा. बाल न्याय कायद्याची समीक्षा करून १६ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीने गंभीर किंवा जघन्य गुन्हा केल्यास गुन्ह्याचे गांभीर्य, परिस्थिती आणि आरोपीची मानसिक परिपक्वता लक्षात घेऊन कठोर कायदेशीर प्रक्रिया लागू करण्याचा विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.
‘मम्मी, मी लवकरच घरी येतो…’
अनीशच्या आईने मुलासोबत झालेल्या शेवटच्या संवादाच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. अपघाताच्या दोन दिवस आधी अनीशशी फोनवर बोलणे झाले होते. तो १४ तारखेला दुबईहून परतला होता. ‘मम्मी, मी लवकरच घरी येतो,’ असे सांगत त्याने दुबईहून आई-वडिलांसाठी चॉकलेट आणि नट्स आणल्याचेही सांगितले होते. दुसऱ्या दिवशी घरात पाहुणे असल्याने आईची अनीशशी बोलणे झाले नाही. त्याच रात्री अपघाताची दुर्दैवी बातमी आली. दुबईत असताना फोनवर बोलणे शक्य नसेल तर अनीश आईला व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेज पाठवत असे. ‘मम्मी, औषधं घेतलीस का? स्वतःची काळजी घेत आहेस ना?’ असे तो विचारायचा. आजही मन अस्वस्थ झाले की त्या जुन्या व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकून आई मुलाच्या आठवणी जागवते.
अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न अधुरे
अनीश सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत मास्टर्स करण्याची त्याची तयारी सुरू होती. त्यासाठी सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्जही निश्चित झाले होते. ‘पप्पा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेन,’ असे तो वडिलांना सांगायचा. आई-वडिलांना सरप्राइज देण्यासाठी अनीशने २० तारखेचे तिकीट बुक केले होते. मित्रांना त्याने घरी येणार असल्याचे सांगितले होते; मात्र आई-वडिलांना त्याने काहीच सांगितले नव्हते. मात्र १९ तारखेच्या रात्री झालेल्या अपघाताने त्याचे हे स्वप्न आणि कुटुंबाची त्याची भेट कायमची अधुरी राहिली. अनीशच्या आईने सांगितले की, त्यांच्या लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त अनीशने दोघांसाठी शिर्डीला जाण्याचे तिकीटही गुपचूप बुक केले होते. तो घरातील मोठा आणि सर्वांचा लाडका मुलगा होता. संपूर्ण कुटुंबाची तो मनापासून काळजी घेत असे.
‘पुण्याचे नाव ऐकले तरी आता भीती वाटते’
अपघातापूर्वी पुण्यात येण्याचा आनंद वाटायचा. कारण मुलगा पुण्यात राहत होता आणि त्याला भेटण्यासाठी पुण्यात येत असल्याचे अनीशच्या आईने सांगितले. मात्र आता पुण्याचे नाव ऐकले तरी भीती वाटते. पुण्यात येण्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘माफी मागून माझा मुलगा परत येणार आहे का?’
अपघातातील आरोपी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधून माफी मागितली का, या प्रश्नावर अनीशच्या आईने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ‘कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. कोणी सॉरीही म्हटले नाही. आणि मला त्यांची सॉरी हवीही नाही. ज्याने माझा मुलगा हिरावून घेतला, त्याच्या सॉरीने माझा मुलगा परत येणार आहे का?’ अनीशच्या वडिलांनी आरोपी पक्षावर गंभीर आरोप करताना सांगितले की, संबंधित लोक प्रभावशाली असल्याने सुरुवातीपासूनच प्रकरण दडपण्याचा आणि प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला.
माणुसकीच्या दृष्टीनेही त्यांच्याकडून कोणताही पश्चात्ताप दिसला नाही, असा आरोप त्यांनी केला.अनीशच्या पालकांनी पुन्हा एकदा पुणे पोलिस, प्रसारमाध्यमे आणि पुणेकरांचे आभार मानत अनीशला न्याय मिळेपर्यंत आपली लढाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

