भोकरमध्ये डुप्लिकेट खतांचा साठा उघड ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 

नांदेड, 8 जून : भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा येथे भेसळयुक्त रासायनिक खतांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत 7 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Adulterated fertilizer sale case bhokar nanded fir)

 

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बल्लाळ तांडा (ता. भोकर, जि. नांदेड) येथे एका वाहनातून विनापरवाना व ई-पॉस प्रणालीचा वापर न करता डुप्लिकेट रासायनिक खतांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. यानंतर कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला.

 

मोठी बातमी ! पुणेकरांनो तयारी ठेवा ; महापौरांचा इशारा

 

 

कारवाईदरम्यान अशोक लेलँड (MH-26/BE-9407) या वाहनातून एनपीके (20:20:0:13) प्रकारच्या भेसळयुक्त खताच्या 60 बॅगा जप्त करण्यात आल्या. प्रत्येकी 50 किलो वजनाच्या या खताच्या बॅगांची किंमत 1 लाख 8 हजार रुपये असून वाहनासह एकूण 7 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी बालाजी माणिका करंडेकर (रा. भोकर) यांच्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदर कारवाई विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी बालाजी मुंडे, जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष सचिन कपाळे, जिल्हा परिषद मोहिम अधिकारी, अमोल पेकम, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषी अधिकारी संदीप कोसकेवार तसेच पी. एम. कद्रेकर यांच्या संयुक्त पथकाने केली.

 

दरम्यान, जिल्ह्यात रासायनिक खतांची जादा दराने विक्री, विनापरवाना विक्री अथवा उपलब्ध साठा असूनही खत विक्रीस नकार दिला जात असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. तसेच केवळ परवानाधारक कृषी निविष्ठा केंद्रातूनच खत व इतर कृषी साहित्य खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

 

 

 

Local ad 1