Hadapsar Nanded Express | हडपसर-नांदेड एक्सप्रेस की पॅसेंजर? ; ४ तास उशिराने धावल्याने प्रवाशांचे हाल
नादेड : नांदेड ते हडपसर आणि हडपसर (पुणे) ते नांदेड दरम्यान धावणारी १७६३०/१७६२९ ही रेल्वे प्रवाशांसाठी खरोखर किती सोयीची आहे, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. एक्सप्रेस म्हणून धावणारी ही रेल्वे प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पॅसेंजरप्रमाणे संथ गतीने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Hadapsar Nanded Express)
नांदेडहून दुपारी ३.३० वाजता सुटणारी १७६३० नांदेड-पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचते. हे प्रवशांत्या दृष्टीने अतिशय गैरसोईची आहे. (हडपसर रेल्वे स्टेशनवर कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. तसेच रस्ता अंरुद असल्याने वाहनांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रिक्षावाले मनमानी पद्धतीने भाडे वसूल करतात. तर हडपसरहून रात्री ९.५० वाजता सुटणारी १७६२९ गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२० वाजता नांदेडला पोहोचणे अपेक्षित असते. मात्र, वेळापत्रक आणि प्रत्यक्ष धावण्यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. रविवारी ही गाडी तब्बल ४ तासांहून अधिक उशिराने धावली. सकाळी १०.२० वाजता नांदेडला पोहोचणारी गाडी दुपारी १.३५ वाजता स्थानकात दाखल झाली. त्यामुळे उन्हाच्या कडाक्यात प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांच्या मते, पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत ही गाडी तुलनेने एक्सप्रेसच्या गतीने धावते. मात्र, छत्रपती संभाजीनगरनंतर जालना आणि पुढील स्थानकांदरम्यान गाडीचा वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो. अनेक क्रॉसिंग, सिग्नल होल्ड आणि स्थानकांवरील थांबे यामुळे प्रवास अधिक प्रदीर्घ होत असल्याची तक्रार आहे.
याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना आणि इतर स्थानकांवरून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी आरक्षित डब्यांमध्ये होते. त्यामुळे आरक्षित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांनाही असुविधा सहन करावी लागत आहे. नांदेड-पुणे मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने पूर्वी आठवड्यातून दोन दिवस धावणारी ही रेल्वे दररोज करण्यात आली. मात्र, सेवा नियमित आणि वेळेवर नसल्याने प्रवाशांचा रोष वाढत आहे.
प्रवाशांचे अनुभव
हडपसर-नांदेड एक्सप्रेस तब्बल चार तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत नांदेडला पोहोचण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना रविवारी मात्र दुपारपर्यंत प्रवास करावा लागला. त्यामुळे कडक उन्हात प्रवाशांचे मोठे हाल झाले.
प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, जनरल आणि स्लीपर कोचमधील प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडे लक्ष वेधले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेतही गाडी अत्यंत संथ गतीने धावत असल्याने प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे. “तिकीटाचे पैसे आगाऊ घेतले जातात, तत्काळ तिकिटांसाठीही अधिक शुल्क आकारले जाते; मात्र वेळेवर सेवा, स्वच्छता आणि खाण्या पिण्याच्या सुविधा याकडे रेल्वेचे दुर्लक्ष आहे,” अशी नाराजी ही व्यक्त केली.
“वंदे भारतच्या युगातही अशा संथ आणि अविश्वसनीय सेवा का दिल्या जात आहेत?” असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच रेल्वेच्या वारंवार होणाऱ्या विलंबामुळे खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय वाढावा म्हणूनच ही निष्क्रियता आहे का, असा उपरोधिक प्रश्नही काहींनी उपस्थित केला.

