National Concrete Day 2026 : पुण्यात आधुनिक काँक्रीट तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन

पुणे : राष्ट्रीय काँक्रीट दिन आणि अभियंता दिन २०२६ निमित्त पुण्यात १० आणि ११ सप्टेंबर रोजी भव्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून ३ हजारांहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी, प्राध्यापक, अभियंते, सल्लागार तसेच बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि कार्यक्रमाचे संयोजक युसुफ इनामदार यांनी दिली.

 

पुणे आरएमसी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) आणि अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (APCOER), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पर्वती येथील APCOER कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अभियांत्रिकी शिक्षण, शासन, पायाभूत सुविधा क्षेत्र, व्यावसायिक संस्था, सल्लागार आणि बांधकाम उद्योग यांना एकाच व्यासपीठावर आणून काँक्रीट व बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत बांधकाम पद्धती आणि तांत्रिक उत्कृष्टतेला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन

युवा अभियंत्यांमधील तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांसह प्रकल्प व स्टार्टअप स्पर्धा, संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरण, काँक्रीट क्यूब स्पर्धा, ग्रीन काँक्रीट मिक्स डिझाईन, CAD ड्रॉइंग, आईस-स्टिक ब्रिज, तांत्रिक प्रश्नमंजुषा आणि नाविन्यपूर्ण कल्पना स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय तांत्रिक परिसंवाद, बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, प्रत्यक्ष उत्पादन प्रात्यक्षिके आणि उद्योग-व्यावसायिक नेटवर्किंग सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग

कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण असलेल्या बांधकाम तंत्रज्ञान प्रदर्शनात बांधकाम, काँक्रीट, पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. XCMG, THERMAX, JSW, Ammann, Putzmeister, REPOS, Sprint यांच्यासह विविध उद्योग संस्था आपल्या आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे, उत्पादने आणि सोल्युशन्सचे प्रदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवा अभियंत्यांना आधुनिक बांधकाम उपकरणे, काँक्रीट तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संवाद अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

शाश्वत बांधकामावर विशेष भर

कार्यक्रमातील तांत्रिक सत्रांमध्ये आधुनिक बांधकाम पद्धती आणि शाश्वत पायाभूत सुविधांबरोबरच मेट्रो रेल अभियांत्रिकी, महामार्ग अभियांत्रिकी, स्ट्रक्चरल व जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, गुणवत्ता नियंत्रण, नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, स्ट्रक्चरल हेल्थ मॉनिटरिंग, बांधकाम सुरक्षा आणि डिजिटल कन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भविष्यातील पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावरही यावेळी चर्चा होणार आहे. विद्यार्थी, अभियंते आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धतींची माहिती मिळणार आहे.

उद्योग-शिक्षण क्षेत्रातील सहकार्याला चालना

उद्योग, शासन आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे, युवा अभियंत्यांना अनुभवी व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक कौशल्याला चालना देणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. नाविन्यपूर्ण विचार, तांत्रिक उत्कृष्टता आणि शाश्वत बांधकामाला प्रोत्साहन देत युवा अभियंत्यांना भविष्यातील पायाभूत सुविधा विकासासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

 

 

Local ad 1