Pune Poison Liquor Case : पुणे : हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथॅनॉल मिश्रित विषारी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे 21 जणांचा मृत्यू झालेल्या गाजलेल्या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे याच्यासह त्याच्या आठ साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. हडपसर परिसरातील चार आणि दापोडी व फुगेवाडी परिसरातील 17 अशा एकूण 21 नागरिकांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद हडपसर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी दत्ता लोंढे (रा. उरुळी कांचन) याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून विषारी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक आणि विक्रीचे जाळे उभे केल्याचे निष्पन्न झाले. या अवैध व्यवसायातून टोळीने मोठा आर्थिक फायदा मिळविल्याचे तपासात समोर आले असून, त्यांच्या कारवायांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणातील आरोपींमध्ये टोळीप्रमुख दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे, आकाश दीपक जाधव (हडपसर), योगेश राजेंद्र व्हनकडे (मुंढवा), राधेश्याम हरीराम प्रजापती (उरुळी कांचन), कल्पेश अशोक अग्रवाल (खडकी), आर्यन संजीव धोत्रे (वडारवाडी), अभिषेक अरुण चौबे, अरुण जगदंबा चौबे आणि अंकित अरुण चौबे (रा. नवी मुंबई) यांचा समावेश आहे.
या कारवाईसाठी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक शामराव काळे यांनी पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या माध्यमातून विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्याकडे मकोका लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. पुराव्यांची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

