लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज निरीक्षक एसीबीच्या तावडीत  

एफएल-३ परवाना आणि मायक्रो ब्रेव्हरीची फाइल मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच; पुणे एसीबीची कारवाई

पुणे : एफएल-३ परवाना मिळवून देण्यासह त्याच फर्मची मायक्रो ब्रेव्हरीची फाइल मंजूर करण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी करण्यात आली.

 

जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणातील तक्रारदार ३७ वर्षीय लायसन्स कन्सल्टंट आहेत. त्यांच्या एका कंपनीच्या एफएल-३ परवान्याची फाइल मंजुरीसाठी शास्त्रीनगर झोनकडे सादर करण्यात आली होती. ही फाइल पुढे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे १२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच, त्याच फर्मची मायक्रो ब्रेव्हरीची फाइल मंजूर करण्यासाठी आणखी ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती.

 

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली. १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान पाटील यांनी तक्रारदाराकडे २२ लाख रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीनंतर ११ लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.

 

त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. सोमवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी ११ लाख रुपयांची लाच स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Local ad 1