पुणे : पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकाच्या वाहनातून तब्बल ८०० जिवंत कोंबड्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १३) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी १ लाख ६० हजार रुपयांच्या मालाची चोरी झाल्याची फिर्याद लष्कर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय उरड (वय ६०, रा. पुणे कॅम्प) हे शेख मंजूर यांच्या डायमंड चिकन सेंटर येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. रविवारी रात्री त्यांनी कोंबड्यांनी भरलेले वाहन पुणे कॅम्प येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये उभे केले होते. सोमवारी पहाटे वाहनसह त्यामधील ८०० जिवंत कोंबड्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनुसार, चोरीस गेलेल्या प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे २०० रुपये असून, एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. बाजार परिसरातील पार्किंगमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.

