International Nurses Day 2026 : जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत साथ देणाऱ्या परिचारिकांना त्रिवार अभिवादन !
माणूस जन्म घेतो, तेव्हा त्याच्या पहिल्या श्वासाची साक्षीदार असते ती परिचारिका; आणि माणूस अखेरचा श्वास घेतो, तेव्हाही त्याच्या शेवटच्या क्षणांची साक्षीदार असते तीच परिचारिका. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाच्या जीवनप्रवासात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. international nurses day 2026
हा दिवस आधुनिक परिचर्या शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या Florence Nightingale यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. १२ मे १८२० रोजी जन्मलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी सन १८५४ मधील Crimean War दरम्यान जखमी सैनिकांवर हातात दिवा घेऊन रात्री निस्वार्थीपणे उपचार केले. त्यांच्या या सेवाभावामुळे त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनही ओळखले जाते.
परिचारिका म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा कणखर कणा. रुग्णालयातील प्रत्येक रुग्णासाठी त्या कधी आई, कधी बहीण, तर कधी मैत्रीण बनून त्याच्या वेदना हलक्या करतात. पांढरा शुभ्र गणवेश, चेहऱ्यावरचे हसू आणि सेवाभावाचा अखंड दीप या माध्यमातून त्या रुग्णांना मानसिक आधार देतात.
तहसीलदारांचे टेन्शन वाढले ; कलम 155 गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही
“आरोग्य सेवा आणि या प्रणालीचा मजबूत कणखर कणा म्हणजे परिचारिका,” असे म्हटले जाते. कारण रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा तो केवळ शारीरिक आजाराने नव्हे तर मानसिक भीतीनेही ग्रासलेला असतो. अशा वेळी परिचारिकांची आत्मीयता हे औषधापेक्षाही मोठे औषध ठरते.
संत Tukaram यांच्या ओळी परिचारिकांच्या कार्याला अगदी समर्पक ठरतात—
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा.”
रुग्णालयात आलेल्या प्रत्येक गरजू व्यक्तीला आपले मानून त्यांची सेवा करणाऱ्या परिचारिका आधुनिक काळातील संतांपेक्षा कमी नाहीत. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता, तासनतास उभे राहून सेवा करणे ही त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष आहे.
कुटुंबाचा त्याग आणि अदृश्य संघर्ष
परिचारिकांच्या सेवायज्ञात त्यांच्या कुटुंबाचाही मोठा त्याग असतो. कर्तव्याची हाक आली की त्या रुग्णसेवेला प्राधान्य देतात. अनेकदा स्वतःची मुले घरी वाट पाहत असताना, त्या दुसऱ्यांच्या आयुष्याचे रक्षण करण्यासाठी रुग्णालयात कार्यरत असतात.
रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधान आणि बरे झाल्यानंतर मिळणारे आशीर्वाद हीच त्यांची खरी कमाई असते.
परिचारिकांसमोरील प्रमुख आव्हाने
सद्यस्थितीत अनेक परिचारिका प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत आहेत. त्यांच्यासमोरील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत .
* शासकीय व प्रशासकीय स्तरावर होणारी हेळसांड
* सुमारे ५० टक्के रिक्त पदांमुळे वाढलेला अतिरिक्त कामाचा ताण
* कामाचे तास निश्चित नसल्याने वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर परिणाम
* प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्याचा अभाव
* रात्रपाळीत सुरक्षेची कमतरता
* राहण्यासाठी अयोग्य व जीर्ण निवासस्थाने
* ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा वाढलेला भार
या सर्व समस्यांमुळे जिल्हा परिषद व ग्रामीण आरोग्य विभागातील परिचारिका मानसिक तणावाखाली जीवन जगत असल्याचे वास्तव आहे.
“दबाव कोणताही असो, जर तो अन्यायकारक असेल आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत असेल तर त्याला झुगारून द्या. व्यक्त व्हा. कारण रुग्णांना तुमची गरज आहे. तुम्ही ठीक, तर रुग्ण ठीक.”कधी आई, कधी बहीण होऊन रुग्णांना सावरणाऱ्या, स्वतःची स्वप्ने विसरून दुसऱ्यांचे आयुष्य वाचवणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनानिमित्त मानाचा मुजरा. आरोग्य व्यवस्थेतील या ‘आरोग्यदूतां’मुळेच समाज अधिक सुरक्षित, निरोगी आणि संवेदनशील बनतो. – मिनाक्षी मुदगल, राज्याध्यक्ष,महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना.

