पुण्यात डीजेचा आवाजही मोठा अन् बाजारही; गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल !

 

पुणे :  पुण्याच्या गणेशोत्सवातील ढोल-ताशांचा पारंपरिक गजर आणि डीजेचा दणदणाट यंदा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचा पोलिसांचा आग्रह, डीजेवरील निर्बंधांना गणेश मंडळांचा विरोध आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात नागरिकांचा वाढता रोष, या पार्श्वभूमीवर डीजे व्यवसायाची कोट्यवधींची आर्थिक उलाढालही समोर आली आहे. पुणे शहरातील साडेतीन हजारांहून अधिक गणेश मंडळांपैकी सुमारे दोन ते अडीच हजार मंडळांकडून डीजेचा वापर केला जात असल्याचा अंदाज आहे. गणेशोत्सवाच्या काळात डीजे, साउंड सिस्टिम, लाईटिंग, एलईडी, ट्रस, मूव्हिंग हेड आणि जनरेटर यांसह संबंधित व्यवसायाची उलाढाल ७० ते ८० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते.

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात डीजे हा आता केवळ मनोरंजनाचा भाग राहिलेला नाही, तर तो आर्थिक आणि सामाजिक चर्चेचा मुद्दा बनला आहे. पोलिस प्रशासनाने यंदा ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक भूमिका घेतली आहे. त्याला काही गणेश मंडळांनी विरोध केला असून, दुसरीकडे मोठ्या आवाजामुळे त्रस्त नागरिकांनीही डीजेविरोधात आवाज उठवला आहे. पोलिसांकडून मांडण्यात आलेला ‘चार टॉप, चार बेस’ हा फॉर्म्युला बहुतांश मंडळांना मान्य होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्षात यामुळे डीजेच्या आवाजाची पातळी किती कमी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

डीजेची ‘सुपारी’ ५० हजारांपासून लाखोंमध्ये

विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक गणेश मंडळे डीजेसोबत साउंड सिस्टिम, लाईटिंग, एलईडी स्क्रीन, ट्रस, मूव्हिंग हेड आणि जनरेटरचे संपूर्ण पॅकेज घेतात. साध्या डीजे सेटअपसाठी साधारण ५० ते ७५ हजार रुपये, तर मोठ्या आणि अत्याधुनिक सेटअपसाठी लाखो रुपये खर्च केले जातात.मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे आणि साउंड सिस्टिमची ‘सुपारी’ पाच ते दहा लाख रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येते. काही प्रीमियम सेटअपसाठी हा खर्च १० ते १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.

 

दोन ते अडीच हजार मंडळांकडून डीजेचा वापर

विसर्जन मिरवणुकीत साधारण तीन हजार गणेश मंडळे सहभागी होतात. यातील काही मंडळे पारंपरिक ढोल-ताशांना प्राधान्य देतात. मात्र, मोठ्या संख्येने मंडळांकडून डीजे आणि साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. एका दिवसाच्या डीजेची ‘सुपारी’ साधारण ५० हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ विसर्जन मिरवणुकीतील डीजे व्यवसायाची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते.

 

पुण्याबाहेरील डीजेंचीही ‘एन्ट्री’

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील स्थानिक डीजे व्यावसायिकांसोबतच बाहेरील शहरांमधून आणि राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणात साउंड सिस्टिम दाखल होतात. पुण्यात सुमारे दीड हजार डीजे व्यावसायिक असल्याचे सांगितले जाते.पोलिसांच्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीच्या काळात गुजरात, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसह इतर शहरांतून ३०० हून अधिक डीजे पुण्यात येतात. दोन ते चार मंडळांच्या ‘सुपाऱ्या’ निश्चित झाल्यानंतर हे व्यावसायिक पुण्यात दाखल होत असल्याचे सांगितले जाते. प्रवासाचा खर्च अनेकदा संबंधित मंडळांकडून केला जातो.

 

कमी खर्चात मोठा आवाज; ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा’ चर्चेत

काही डीजे सेटअपमध्ये ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा’सारख्या उपकरणांचा वापर केला जातो. तुलनेने कमी खर्चात मोठ्या आवाजाची यंत्रणा उपलब्ध होत असल्याने काही मंडळांकडून अशा सेटअपला पसंती दिली जाते. मात्र, या यंत्रणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ‘आवाज कोणाचा भारी?’ या स्पर्धेतून मिरवणुकीतील ध्वनीची पातळी वाढत जाते. त्याचा परिणाम रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांवर होण्याची शक्यता असते.

 

‘सरसकट बंदी नको; कर्णकर्कश यंत्रणांवर नियंत्रण आणा’

पुणे साऊंड असोसिएशनच्या मते, डीजेवर सरसकट बंदी घालण्याऐवजी कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या विशिष्ट यंत्रणांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. प्रोफेशनल साउंड सिस्टिमचा वापर केल्यास आवाजाचा त्रास तुलनेने कमी होऊ शकतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवतानाच संबंधित व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

 

एका डीजेमागे पाच ते सहा जणांचा रोजगार

डीजे व्यवसायाचा परिणाम केवळ डीजे मालक किंवा ऑपरेटरपुरता मर्यादित नाही. एका डीजेसोबत साधारण पाच ते सहा जणांची आवश्यकता भासते. डीजे ऑपरेटर, वाहनचालक, वायरिंग व फिटिंग करणारे कर्मचारी, साउंड सिस्टिम हाताळणारे तंत्रज्ञ यांचा त्यात समावेश असतो. त्यामुळे डीजेवर मोठे निर्बंध आल्यास या व्यवसायावर थेट अवलंबून असलेल्या कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

डीजेसोबत जनरेटर, वाहतूक आणि तंत्रज्ञांचाही व्यवसाय

मोठ्या डीजे सेटअपसाठी मोठ्या क्षमतेचा जनरेटर आवश्यक असतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात जनरेटर भाड्याने देणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठी मागणी असते. डीजेचा वापर कमी झाल्यास त्याचा परिणाम जनरेटर, वाहतूक, वायरिंग, फिटिंग आणि तांत्रिक मनुष्यबळ या संपूर्ण साखळीवर होऊ शकतो. त्यामुळे डीजे व्यवसायाभोवती अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित जोडलेले आहे.

 

प्रीमियम सेटअपसाठी लाखोंचा खर्च

मोठ्या गणेश मंडळांसाठी साउंड सिस्टिम, लाईटिंग, एलईडी, ट्रान्सपोर्ट, तंत्रज्ञ आणि अतिरिक्त उपकरणांचा समावेश असलेल्या पॅकेजसाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. मोठ्या मिरवणुकीसाठी संपूर्ण पॅकेजचा खर्च तीन ते पाच लाख रुपये, तर अतिभव्य आणि प्रीमियम सेटअपसाठी १० ते १२ लाख रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे डीजे हा केवळ गणेशोत्सवातील मनोरंजनाचा भाग राहिलेला नसून त्याभोवती मोठी आर्थिक साखळी निर्माण झाली आहे.

 

नियम मोडल्यास डीजे बंद; उपकरणे जप्त होण्याची शक्यता

ध्वनिप्रदूषणाच्या नियमांनुसार केवळ स्पीकरजवळील आवाजाची पातळी महत्त्वाची नसून ज्या परिसरात ध्वनीचा परिणाम होतो, तेथील निर्धारित ध्वनिमर्यादाही महत्त्वाची असते. निवासी भागात रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध आहेत.नियमांचे उल्लंघन झाल्यास साउंड सिस्टिम बंद करण्याच्या आदेशासोबत उपकरणे जप्त करण्याची तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता असते. पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ अंतर्गतही कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार उल्लंघनासाठी कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय पोलिसांच्या परवानगीतील अटींचा भंग, सार्वजनिक शांततेचा भंग किंवा न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्यास स्वतंत्र कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 

डीजेचा दणदणाट विरुद्ध कोट्यवधींचा व्यवसाय

गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजाचा मुद्दा यंदा अधिक तीव्र झाला आहे. एका बाजूला शांतता, आरोग्य आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला डीजे व्यावसायिक, कामगार, जनरेटर, वाहतूक, साउंड सिस्टिम आणि तंत्रज्ञांशी जोडलेली मोठी आर्थिक साखळी आहे.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात प्रश्न केवळ ‘डीजेचा दणदणाट किती?’ एवढाच राहिलेला नाही. ‘ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणताना कोट्यवधींच्या या व्यवसायाचे गणित कसे बदलणार?’ हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

 

 

 

Local ad 1