pune municipal health budget 2026 : पुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्यावर भर देत पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात “निरोगी पुणे” या संकल्पनेअंतर्गत अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या या अंदाजपत्रकात आरोग्य सेवांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून विद्यमान सुविधांचे सक्षमीकरण आणि नव्या सेवा सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ (IVF) उपचार सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वंध्यत्व वरील आधुनिक उपचार गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत. (pune municipal health budget 2026 nirogi pune plan)
सध्या मनपाचे ५३ बाह्यरुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे, ४०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय आणि संसर्गजन्य आजारांचे रुग्णालय कार्यरत आहे. दररोज सरासरी १२ हजार बाह्यरुग्ण आणि ३०० आंतररुग्ण उपचार घेत असून दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते तसेच दरवर्षी सुमारे ८५०० प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये होतात. या सेवा विनामूल्य उपलब्ध असून शहरी गरीबांसाठी औषधे व वैद्यकीय सहाय्य योजनांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमला नेहरू रुग्णालय आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयाच्या आधुनिकीकरण व विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. वारजे येथे १० हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर ३५० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. कर्करोग उपचारासाठी बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत मनपाचे पहिले कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार असून येथे रेडिओथेरपीसारखे उपचार सीजीएचएस दरात उपलब्ध होतील. तसेच गंगाधाम परिसरात एमआरआय आणि सीटी-स्कॅन केंद्र उभारण्यात येणार असून महागड्या निदान चाचण्या कमी दरात उपलब्ध होतील.
कर्करोग आणि मूत्रपिंड विकारांवरील डायलिसिस उपचारांसाठी आर्थिक सहाय्याची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे। पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची पुनर्रचना करून ती अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.

