सरकारी नोकऱ्यांतील 50 लाख रिक्त पदे वर्षभरात भरा; युवक काँग्रेसचे ‘मेरी डिग्री का क्या?’ अभियान

परीक्षा ते नियुक्तीपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी

 

पुणे : देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये 50 लाख 5 हजार 850 मंजूर पदे रिक्त असल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे. ही सर्व रिक्त पदे एका वर्षाच्या आत भरण्यासाठी केंद्र सरकारने कालबद्ध भरती कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करत इंडियन यूथ काँग्रेसने ‘मेरी डिग्री का क्या?’ या देशव्यापी अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानाची महाराष्ट्रातील भूमिका पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

 

इंडियन यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिंब यांनी इंदूर येथे या अभियानाची राष्ट्रीय पातळीवर सुरुवात केली. यावेळी अभियानाची वेबसाइट आणि पुढील वर्षभराचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात हे अभियान प्रत्येक जिल्ह्यापर्यंत नेण्याची घोषणा करण्यात आली.

 

 

‘युवकांच्या मेहनतीला न्याय हवा’

उदय भानू चिब यांनी सांगितले की, देशातील लाखो युवक पदवी आणि आवश्यक पात्रता मिळवूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. सामान्य कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आर्थिक भार उचलतात. त्यानंतरही सरकारी विभागांमधील मंजूर पदे रिक्त का ठेवली जात आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

एका वर्षात रिक्त पदे भरण्यासाठी ठोस कार्यवाही न झाल्यास देशभर ‘जॉब मार्च’ आणि ‘डिग्री मार्च’ आयोजित करून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

महाराष्ट्रातील रिक्त पदांची माहिती जाहीर करण्याची मागणी

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष.*शिवराज मोरे यांनी केंद्र आणि राज्यातील विविध विभागांमध्ये किती मंजूर पदे रिक्त आहेत, किती भरती प्रक्रिया प्रलंबित आहेत आणि त्या कधी पूर्ण होणार, याची माहिती सरकारने सार्वजनिक करावी, अशी मागणी केली.

 

हे अभियान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांशी संवाद साधला जाणार आहे. बेरोजगारी आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेचे प्रश्न सरकारसमोर मांडण्यात येणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

 

परीक्षा ते नियुक्तीपर्यंत निश्चित कालमर्यादा

प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे यांनी सरकारी भरती प्रक्रियेसाठी वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करण्याची मागणी केली. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी आणि अंतिम नियुक्तीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा असावी, असे त्यांनी सांगितले.

 

परीक्षा पुढे ढकलणे, निकाल रखडणे आणि नियुक्त्यांना होणाऱ्या विलंबामुळे उमेदवारांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली.

 

 

युवक काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

* 50,05,850 रिक्त मंजूर पदे एका वर्षात भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा.

* केंद्र आणि राज्यातील विभागनिहाय रिक्त पदांची अद्ययावत माहिती सार्वजनिक करावी.

* प्रत्येक सरकारी विभागाने वार्षिक भरती कॅलेंडर जाहीर करावे.

* जाहिरात ते अंतिम नियुक्तीपर्यंत निश्चित कालमर्यादा ठरवावी.

* प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात.

* परीक्षा आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चित करावे.

* रिक्त पदे आणि झालेल्या नियुक्त्यांचा नियमित सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करावा.

 

Local ad 1