Heat Wave Alert : उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी पशुपालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघात, दूध उत्पादनात घट आणि निर्जलीकरणाचा धोका; पशुवैद्यकीय विभागाने दिल्या सूचना
Heat Wave Alert : पुणे, 29 एप्रिल : राज्यात सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असून आगामी काही दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेचा फटका पशुधनालाही बसू शकतो. त्यामुळे जनावरांमध्ये उष्माघात, भूक मंदावणे, निर्जलीकरण, दूध उत्पादनात घट तसेच गंभीर परिस्थितीत मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना पशुधनाच्या संरक्षणासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
जनावरांसाठी पाण्याची योग्य व्यवस्था करा
उन्हाळ्यात जनावरांना दिवसभर स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. पाण्याच्या टाक्या, टब आणि पाणवठे नियमित स्वच्छ ठेवावेत. शक्य असल्यास पाण्यात इलेक्ट्रोलाइट किंवा खनिज मिश्रण मिसळावे.
सावली आणि हवा खेळती राहील याची काळजी
जनावरांना थेट उन्हात बांधणे टाळावे. गोठ्यांवर शेडनेट, ताडपत्री किंवा गवताचे आच्छादन करावे. गोठ्यात पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी योग्य व्यवस्था ठेवावी.
महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत
आहार व्यवस्थापन महत्त्वाचे
सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. दुपारच्या कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. आहारात खनिज मिश्रण आणि मीठाचा संतुलित वापर करावा. दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्सचा वापर करावा. म्हशींसाठी पाण्यात बसण्याची व्यवस्था असल्यास अधिक फायदेशीर ठरते. दुपारी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत जनावरांची वाहतूक टाळावी. बाजार, स्पर्धा किंवा लांब पल्ल्याच्या हालचाली सकाळी किंवा संध्याकाळीच कराव्यात.
ही लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या
धाप लागणे, जास्त लाळ येणे, शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती, अशक्तपणा, खाद्य व पाणी कमी घेणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
कुक्कुटपालकांसाठी विशेष सूचना
कुक्कुटपालन शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे. पक्ष्यांना स्वच्छ व थंड पाणी सतत उपलब्ध करून द्यावे. गर्दी टाळावी आणि इलेक्ट्रोलाइटचा वापर करावा. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.

