पुणे : जागतिक स्तरावरील फार्मास्युटिकल, क्रॉप प्रोटेक्शन आणि स्पेशालिटी केमिकल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘हिकल लिमिटेड’ने (Hikal Limited) त्यांच्या पुण्यातील रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (R&T) कॅम्पसमध्ये एका अत्याधुनिक पायलट प्लांटची सुरुवात केली आहे. करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (cGMP) अनुपालन असलेल्या या प्लांटचे यशस्वी कमिशनिंग झाल्याची घोषणा कंपनीने केली आहे. या महत्त्वपूर्ण विस्तारामुळे पुण्यातील इनोव्हेशन कॅम्पसमधील प्रोसेस डेव्हलपमेंट, स्केल-अप, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि क्लिनिकल-स्टेज मॅन्युफॅक्चरिंग या क्षमतांना मोठे बळ मिळणार आहे.
प्रयोगशाळा ते व्यावसायिक उत्पादन प्रवास होणार सोपा
हा अद्ययावत पायलट प्लांट जागतिक गुणवत्ता आणि नियामक मानकांचे काटेकोरपणे पालन करून उभारण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील संशोधन आणि प्रत्यक्ष व्यावसायिक उत्पादन यामधील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. यामुळे जागतिक फार्मास्युटिकल ग्राहकांना विकासाची वेळ कमी करण्यास, प्रक्रियेची विश्वासार्हता वाढविण्यास आणि नियामक विकास कार्यक्रमांसाठी उच्च दर्जाचे साहित्य तयार करण्यास मोठी मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, याच कॅम्पसमधून प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल टप्प्यांसाठी आवश्यक साहित्याचे उत्पादन आणि पुरवठा करणे आता सहज शक्य होणार आहे. यामुळे वैज्ञानिक आणि अभियंत्यांना प्रक्रियांवर बारकाईने लक्ष ठेवता येईल आणि प्रकल्पाचा वेळ वाचून ते वेळेत पूर्ण करण्यास मदत मिळेल.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
ही नवीन सुविधा विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांसाठी अत्यंत लवचिक असून cGMP-अनुपालन स्केल-अपला पाठबळ देण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. या प्लांटमध्ये २० लिटरपासून ते २,००० लिटर क्षमतेपर्यंतचे स्टेनलेस स्टील आणि ग्लास-लाइनड रिअॅक्टर्स बसवण्यात आले आहेत. तसेच, डिस्टिलेशन आणि फिल्ट्रेशनसाठी अत्याधुनिक उपकरणे, हॅस्टेलॉय अॅजिटेटेड नट्शे फिल्टर ड्रायर्स (ANFD), क्रायोजेनिक रिअँक्शन्स, हायड्रोजनेशन, उच्च तापमानावरील रासायनिक प्रक्रिया आणि उच्च व्हॅक्यूम डिस्टिलेशन यांसारख्या व्यापक प्रक्रिया क्षमता येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
“आमच्या cGMP पायलट प्लांटचे कमिशनिंग हे हिकलच्या फार्मास्युटिकल डेव्हलपमेंट आणि स्केल-अप प्लॅटफॉर्मला अधिक सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे प्रयोगशाळेतील संशोधनापासून ते मोठ्या प्रमाणावरील क्लिनिकल डेव्हलपमेंट कार्यक्रमांपर्यंत ग्राहकांना सहकार्य करण्याची आमची क्षमता कैकपटीने वाढेल. गुणवत्ता, सुरक्षितता आणि अनुपालन या आमच्या मूलभूत मूल्यांप्रती आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.”
– समीर हिरेमठ, व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, हिकल लिमिटेट

