कोअर कमिटीचा निर्णय: पुणे मनपात भाजपचे 100 उमेदवार फायनल !
शिवसेना (शिंदे) सोबत जागावाटपावर तिढा कायम
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची (भाजप) पहिली उमेदवार यादी जवळपास निश्चित झाली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत 100 पेक्षा अधिक उमेदवारांच्या नावांवर एकमत झाले असून, 40 ते 50 नावांवर सहमती न झाल्याने हा निर्णय प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे. भाजप कोअर कमिटीने मंजूर केलेली पहिली यादी गुरुवारी (25 डिसेंबर) प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार असून, शुक्रवारी (26 डिसेंबर) ती अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. (Pune Mahanagarpalika Election: BJP First Candidate List Ready, Seat Sharing Dispute with Shinde Sena)
भाजप–शिवसेना (शिंदे) युतीत जागावाटपाचा तिढा
पुणे महापालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे) युतीतून लढवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाने शहरातील 34 जागांची मागणी केली असली तरी भाजपने केवळ 16 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जागावाटपावर तोडगा न निघाल्याने हा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आला आहे.
एकहाती सत्ता लक्ष्य, कोअर कमिटीची मॅरेथॉन बैठक
महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार निवडीसाठी बुधवारी आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये कोअर कमिटीची प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. बैठकीत विधानसभानिहाय प्रभाग रचना आणि उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. संबंधित विधानसभा मतदारसंघातील आमदार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून अनेक प्रभागांतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. ज्या प्रभागांमध्ये एकमत झाले नाही, त्या जागांवरील अंतिम निर्णय प्रदेश नेतृत्व घेणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या टप्प्यात उर्वरित यादी
पहिल्या टप्प्यात सुमारे 100 उमेदवारांची नावे निश्चित झाली असून, उर्वरित 40 ते 50 जागांवर पुढील चर्चा करून दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर केली जाणार आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाला 34 जागांची अपेक्षा
पुणे महापालिका निवडणूक भाजप–शिवसेना (शिंदे) युतीतून लढवली जात असली तरी जागावाटपावर मतभेद तीव्र झाले आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाने 34 जागांची मागणी केली आहे. मात्र भाजप केवळ 16 जागा देण्यावर ठाम असल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. “जर अशाच पद्धतीने जागावाटप होणार असेल, तर महायुतीचा फायदा काय?” असा सवाल शिवसेना (शिंदे) पक्षाकडून उपस्थित केला जात आहे.
WEB Title : Pune Mahanagar palika Election: BJP First Candidate List Ready, Seat Sharing Dispute with Shinde Sena

