पुणे, ता. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या चार दिवसांत राज्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून, पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची रक्कम प्रमाणीकरणानंतर थेट त्यांच्या कर्जखात्यात जमा होणार आहे. तसेच, योजनेची दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी मंगळवारी दिली.
व्यापारी बँकांमधील अनुत्पादित (NPA) कर्जखात्यांसाठी शासनाने तडजोडीचे धोरण लागू केले असून, त्यानुसारच कर्जखात्यांचे प्रमाणीकरण केले जात आहे. त्यामुळे पहिल्या यादीतील कर्जमाफीची रक्कम आणि आधार प्रमाणीकरणावेळी प्रणालीवर दिसणाऱ्या रकमेतील तफावत ही या तडजोडीच्या सूत्रामुळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तावरे यांनी सांगितले की, पात्र शेतकऱ्यांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची अंतिम रक्कम थेट संबंधित कर्जखात्यात जमा केली जाईल. कर्जखाते शून्य झाल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज घेणे अधिक सुलभ होणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- पहिल्या चार दिवसांत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
- दुसरी राज्यस्तरीय यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार
- पहिल्या यादीत 16.96 लाख शेतकरी पात्र
- 13,600 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ
- 31.17 लाख शेतकऱ्यांची माहिती प्रणालीमध्ये प्राप्त
- आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्जखात्यात जमा होणार
- पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही

