स्वच्छ ऊर्जेमुळे ग्रामीण महिलांच्या शेतीला नवी दिशा !
सोलर साधनांनी खर्च कमी, कष्ट हलके; महिलांची उद्योजक म्हणून पुढे वाटचाल
पुणे : ग्रामीण भागात शेतीची धुरा सांभाळणाऱ्या महिलांसाठी स्वच्छ ऊर्जेवर आधारित साधने नवे परिवर्तन घडवत आहेत. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक यंत्रांमुळे होणारा आर्थिक व शारीरिक त्रास आता सोलर तंत्रज्ञानामुळे कमी होत असून, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये महिलांचा आत्मविश्वास आणि उत्पन्न दोन्ही वाढत आहे. (solar farming tools rural women maharashtra)
चिलवाडी (ता. धाराशिव) येथील शेतकरी महिला शीला जगताप (वय ४५) यांचे उदाहरण हे या बदलाचे प्रतीक ठरत आहे. फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या जड पेट्रोल यंत्रामुळे दरमहा हजार रुपयांहून अधिक इंधन खर्च आणि तीव्र शारीरिक थकवा सहन करावा लागत होता. मात्र सोलर फवारणी यंत्र स्वीकारल्यानंतर त्यांचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला असून कामाचा ताण ही घटला आहे.
पुण्यात राजकीय भूकंप? महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग
महिलांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ ऊर्जेचा प्रसार
महाराष्ट्रातील सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज (SURE) या संस्थेने महिलांच्या नेतृत्वाखाली विकेंद्रीत नवीकरणीय ऊर्जा (DRE) साधनांचा प्रसार सुरू केला आहे. ‘सखी’ या मॉडेलअंतर्गत स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन त्या सोलर फवारणी यंत्रे, सोलर रेफ्रिजरेटर, हायड्रोपोनिक चारा युनिट्स यांसारख्या तंत्रज्ञानाची माहिती व प्रात्यक्षिके देतात. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विश्वास. शेजारी, शेतकरी आणि समुदायातीलच महिलांकडून माहिती मिळाल्याने ग्रामीण भागात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने होत आहे. अनेक महिला केवळ वापरकर्त्या न राहता मार्गदर्शक आणि उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.
BJP Lotus Operation : पुणे शिवसेना (UBT) मुक्त; भाजपचे ‘लोटस ऑपरेशन’
सोलर फवारणी यंत्रातून उत्पन्नाचा नवा स्रोत
SURE च्या प्रशिक्षणादरम्यान शीला जगताप यांना NIYO Farm Tech कंपनीचे सोलर फवारणी यंत्र वापरून पाहण्याची संधी मिळाली. हे यंत्र हलके, इंधनविरहित आणि दीर्घकाळ वापरण्यास सोपे आहे. सखी सवलतीच्या मदतीने त्यांनी हे यंत्र खरेदी केले. आज त्या हे यंत्र गावात प्रात्यक्षिकांसाठी वापरतात आणि दरमहा ६०० ते ७०० रुपयांना भाड्याने देतात. यामुळे शेतीसह अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला झाला आहे. “आता महिलाच माझ्याकडे सल्ल्यासाठी येतात,” असे त्या अभिमानाने सांगतात.
‘पॉवरिंग लाइव्हलिहुड्स’ उपक्रमाला चालना
SURE चे काम Villgro Innovations Foundation आणि Council on Energy, Environment and Water (CEEW) यांच्या Powering Livelihoods या उपक्रमाशी जोडलेले आहे. या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असून स्थानिक वितरण व्यवस्था मजबूत केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ‘एक्सपिरियन्स सेंटर’मुळे शेतकऱ्यांना खरेदीपूर्वीच सोलर साधने हाताळून पाहण्याची संधी मिळत आहे. हे केंद्र सख्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र म्हणूनही कार्यरत आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेत शांत पण निर्णायक बदल
CEEW च्या अभ्यासानुसार, देशभरात विकेंद्रीत नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानामुळे सुमारे ३.७ कोटी उपजीविकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र त्याचे प्रत्यक्ष फायदे आजच ग्रामीण भागात दिसत आहेत. महिलांचा श्रमभार कमी होत असून शेतीवरील खर्च घटत आहे आणि त्या नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत.स्वच्छ ऊर्जेची ही चळवळ केवळ तांत्रिक सुधारणा नाही, तर ग्रामीण महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्षम करणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी दिशा ठरत आहे.

