Pune Crime News । नावाची नंबर प्लेट उलट्या दिशेने लावली अन् बनाव झाला उघड !
तोतया महिला पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा
Pune Crime News। पुणे : डॉक्टरांकडे लवकर नंबर मिळवण्यासाठी एका तरुणीने थेट पोलिस अधिकाऱ्याची वर्दी परिधान करून रुग्णालयात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. मात्र, वर्दीवरील नावाची नंबर प्लेट चुकीच्या बाजूला लावल्याने तिचा बनाव काही वेळातच उघड झाला. कॅम्प परिसरातील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला.
समिना आफिस इनामदार उर्फ समिना आयु पठाण (वय २५, रा. म्हाळुंगे) असे या तोतया महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तिच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस फौजदार महेश भगवान शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास व्हिक्टरी थिएटर समोरील संजीवन स्किन क्लिनिक येथे घडली. महेश शिंदे हे क्लिनिकमध्ये आले असता समिना खाकी वर्दी घालून तेथे पोहोचली. तिच्या वर्दीवरील नावाची पाटी नियमानुसार उजव्या बाजूला असण्याऐवजी डाव्या बाजूला लावलेली होती. यानंतर तिने डॉक्टरांकडे आपला नंबर लावून देण्याची विनंती केली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शिंदे यांनी ती कोणत्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहे, अशी विचारणा केली. त्यावर तिने बाणेर पोलिस ठाण्यात कार्यरत असून रात्रपाळी करून थेट येथे आल्याचे सांगितले.
मात्र, उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने शिंदे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून अधिक चौकशी केली. चौकशीत संबंधित तरुणी कोणतीही पोलिस अधिकारी नसून तोतया पोलिस उपनिरीक्षक असल्याचे समोर आले. या प्रकरणी समिना इनामदार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक यादव पुढील तपास करत आहेत.

