...

Heat stroke symptoms ! उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या सूचना

heat wave heat stroke precautions maharashtra

 

Heat stroke symptoms पुणे : राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता वाढली आहे. उष्णतेकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघातासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. सामान्यतः मानवी शरीराचे तापमान ३६.४°C ते ३७.२°C दरम्यान असते. मात्र अत्यंत उष्ण हवामानात शरीरावर ताण येऊन उष्णतेशी संबंधित विविध आजार होऊ शकतात. अंगावर पुरळ येणे, हात-पायांना सूज येणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, थकवा जाणवणे, गोंधळल्यासारखे वाटणे तसेच उष्माघात होणे अशी लक्षणे दिसू शकतात. उष्णतेमुळे हृदय, श्वसन आणि किडनीसारख्या जुनाट आजारांवरही अतिरिक्त ताण पडू शकतो. (heat wave heat stroke precautions maharashtra)

 

 

माहिती द्या आणि बक्षीस मिळवा ! गर्भलिंग निदान थांबवण्यासाठी सरकारची खबरी योजना

 

 

उष्णतेमुळे दिसणारी लक्षणे
अति उष्णतेमुळे शरीरावर विविध प्रकारचे परिणाम दिसू शकतात. त्यामध्ये चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या होणे, अति तहान लागणे, गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, जलद श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके वाढणे यांचा समावेश होतो.

 

उष्माघाताची गंभीर लक्षणे
उष्माघात ही अत्यंत गंभीर स्थिती असून त्यामध्ये शरीराचे तापमान ४०°C किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते. यावेळी तीव्र डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, स्नायूंमध्ये पेटके, बेशुद्ध पडणे, गोंधळ, चिडचिड, त्वचा गरम व कोरडी होणे अशी लक्षणे दिसतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण कोमामध्येही जाऊ शकतो. मुलांमध्ये भूक न लागणे, जास्त चिडचिड, लघवीचे प्रमाण कमी होणे, तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, सुस्ती, चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

 

उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे?
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीला तात्काळ थंड किंवा सावलीच्या ठिकाणी हलवावे. त्यांचे कपडे सैल करावेत आणि शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. शक्य असल्यास शरीरावर थंड पाण्याचा शिडकावा करावा आणि वारा मिळेल याची व्यवस्था करावी. व्यक्ती शुद्धीत असल्यास त्याला पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा कैरीचे पन्हे यांसारखे द्रव पदार्थ द्यावेत. मात्र व्यक्ती बेशुद्ध असल्यास काहीही खायला किंवा प्यायला देऊ नये. गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेऊन उपचार घ्यावेत.

 

 

उष्माघात झालेल्या मुलांसाठी प्रथमोपचार
मुलांना उष्णतेचा त्रास झाल्यास त्यांना तात्काळ घरात किंवा सावलीत आणावे. त्यांचे कपडे सैल करावेत आणि थंड पाण्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात. उलटी होत असल्यास मुलाला एका कुशीवर झोपवावे, जेणेकरून गुदमरू नये. पंख्याचा वापर करून हवा मिळेल याची व्यवस्था करावी. मूल शुद्धीत असल्यास त्याला थंड पाण्याचे छोटे घोट द्यावेत.

 

उष्माघातापासून बचावासाठी उपाय
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे. बाहेर जाताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ताजे आणि हलके अन्न खावे. फळे, सलाड आणि पचायला हलका आहार घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे व भाज्यांचा आहारात समावेश करावा. पातळ, सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना टोपी, कपडा किंवा छत्रीचा वापर करून डोके झाकावे. शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे. बाहेरची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. घरातील खिडक्या व पडदे दिवसा बंद ठेवून घर थंड ठेवावे आणि रात्री हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी.

 

कोणाला जास्त धोका?
लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, घराबाहेर काम करणारे कामगार, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले रुग्ण आणि मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना उष्णतेचा अधिक धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 

 

काय करू नये?
रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये. तिखट, मसालेदार किंवा शिळे अन्न खाणे टाळावे. जास्त वेळ उन्हात राहू नये. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखर जास्त असलेली शीतपेये टाळावीत. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी एकटे सोडू नयेत. वाहनातील तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. एखादी व्यक्ती बेशुद्ध, गोंधळलेली किंवा उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने १०८ किंवा १०२ या आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा.

“उन्हाळ्यात बाहेर जाताना पिण्याचे पाणी किंवा ज्यूस सोबत ठेवा. शरीर हायड्रेटेड राहील याची काळजी घ्या. पातळ सुती कपडे वापरा आणि सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करा. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.” – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक, पुणे.

Local ad 1