Purandar Airport News : घरासह फळबागांचेही मिळणार वेगळे पैसे; प्रशासनाचा सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा ‘प्लॅन’!
Purandar Airport News : पुणे : पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा साठी भूसंपादन प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना एकरी तब्बल १.५ कोटी रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा मोबदला ४ मेपासून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे.
महापौर बंगल्यात २१ झाडांची कत्तल ; आयुक्त नवल किशोर राम यांचा कडक पवित्रा, दोषींवर कारवाईचे संकेत
विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील सुमारे तीन हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली होती. मात्र, मोबदल्याचा दर निश्चित न झाल्याने भूसंपादन प्रक्रिया रखडली होती. गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीने भूसंपादनाचा दर निश्चित केल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
६ हजार कोटींचा निधी, पहिल्या टप्प्यात ५०० कोटी जमा
विमानतळासाठी लागणाऱ्या भूसंपादन निधीसाठी राज्य सरकारने हुडकोकडून ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. या विशेष हेतू प्राधिकरणामध्ये सिडकोचा ५१ टक्के वाटा असून, एमआयडीसी, एमएडीसी आणि पीएमआरडीए या संस्थांचाही सहभाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण निधीपैकी ५०० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे.
घरे, झाडे, विहिरींचे स्वतंत्र मूल्यांकन
भूसंपादन प्रक्रियेदरम्यान केवळ जमिनीच नव्हे, तर घरे, झाडे, विहिरी, फळबागा आणि अन्य मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यांकन करून अतिरिक्त मोबदला दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. प्रशासनाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर मोबदला वितरण आणि जमीन ताबा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन केले आहे. पुढील सहा महिन्यांत संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची संमती, प्रकल्पाला वेग
या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे संमतीपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे मोबदला वितरण सुरू होताच जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्याची शक्यता आहे.

