जेजुरीत भीषण अपघात; वारकऱ्यांना ट्रकची धडक, तीन महिला ठार, चौघी जखमी

पुणे : आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर दिंडीच्या ट्रकने सात महिला वारकऱ्यांना धडक दिल्याने तिघींचा मृत्यू झाला, तर चौघी जखमी झाल्या. या घटनेमुळे वारी मार्गावर हळहळ व्यक्त होत असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीचा ट्रक सांगली जिल्ह्यातील कसबे डिगराज येथील दिंडीतील महिला वारकऱ्यांच्या अंगावर गेला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या.

 

अपघातानंतर स्थानिक नागरिक, वारकरी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रकचालकाचा निष्काळजीपणा, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणते कारण याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

 

आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले असताना घडलेल्या या दुर्घटनेने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख आणि अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल पोलिसांकडून अपेक्षित आहे.

Local ad 1