पुणे : नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला यश मिळाल्याने महाविकास आघाडी समोर आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती बदलण्याचे आव्हान उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. (pune politics ajit pawar sharad pawar ncp alliance pmc election) दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जगताप म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आघाडीबाबत संवाद सुरू आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.mhtimes.in/pune-ajit-pawar-ncp-success-municipal-elections-analysis/
भाजपने नुकतेच केलेल्या पक्षप्रवेशांमुळे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगर परिषदांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी काही माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश झाले. काँग्रेसचे माजी नगरसेवक रशीद शेख, मुख्तार शेख, सचिन बराटे, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या श्वेता चव्हाण तसेच मनसेच्या माजी नगरसेविका अस्मिता शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणखी काही नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याचीही चर्चा आहे.
भाजपसमोर आव्हान उभे राहणार?
महापालिका निवडणुकीत महायुती एकत्रितपणे मैदानात उतरणार असल्याने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सध्या एकाकी पडल्याचे चित्र आहे. मात्र नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली असून, काँग्रेसलाही अनपेक्षित यश मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील यशानंतर आता महापालिकेत भाजपसमोर प्रभावी आव्हान उभे करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते विविध पातळ्यांवर मतांची चाचपणी करत असून अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
महाविकास आघाडीचे भवितव्य काय?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून निवडणूक लढवणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना महाविकास आघाडीतील अन्य पक्ष स्वीकारतील का, याबाबतही साशंकता आहे. तसेच ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाल्यास जागावाटपाचे गणित कसे जुळणार, हे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
Web Title : Pune Politics Ajit Pawar–Sharad Pawar NCP Alliance Talks Before PMC Elections

