...

BJP Lotus Operation : पुणे शिवसेना (UBT) मुक्त; भाजपचे ‘लोटस ऑपरेशन’

२०१७ चे एकही माजी शिवसेना नगरसेवक उद्धव ठाकरे गटात शिल्लक नाहीत

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपने पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का देत “शिवसेना (UBT) मुक्त पुणे”कडे निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. (Pune UBT Shiv Sena Free | BJP Lotus Operation Success | PMC Election 2025) २०१७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यातील बहुसंख्य नगरसेवक उद्धव ठाकरे गटात होते. मात्र सध्याच्या घडीला २०१७ मध्ये निवडून आलेला एकही नगरसेवक ठाकरे गटात शिल्लक राहिलेला नाही.

मंगळवारी शिवसेना (UBT) चे माजी नगरसेवक संजय भोसले आणि पृथ्वीराज सुतार यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे पुणे शहरातील ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या दुसऱ्या टप्प्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे आणि निवडणूक समन्वयक गणेश बिडकर उपस्थित होते. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत आणखी काही नेत्यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

 

सत्तेचा फायदा, संघटनेची ताकद : अजित पवारांचा पुणे जिल्ह्यातील विजयमार्ग सुखर !

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना (UBT) ला सतत धक्के बसताना दिसत आहेत. पहिल्या टप्प्यात विविध पक्षांतील ११ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर दुसऱ्या टप्प्यात ठाकरे गटातील दोन माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. विधानसभा निवडणुकीनंतरही शिवसेना (UBT) चे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय, माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.

२०१७ मध्ये निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक सध्या कुठे?

भाजप : संगीता ठोसर, बाळा ओसवाल, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, प्राची आल्हाट
काँग्रेस : अविनाश साळवे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : श्वेता चव्हाण
शिवसेना (शिंदे गट) : नाना भानगिरे

संजय भोसले म्हणाले, “मागील दोन निवडणुकांत आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला. ज्या काँग्रेसविरोधात आम्ही लढा दिला, त्याच काँग्रेसकडे जागा मागण्याची वेळ आली. येरवडा मतदारसंघात हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे त्रस्त होऊन आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला.”

पृथ्वीराज सुतार म्हणाले, “कोथरूडमध्ये ४० वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून काम केले. भाजपने माझ्या विकासकामांना पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास अजेंड्यामुळे प्रेरित होऊन मी भाजपमध्ये आलो आहे. तिकीट मिळो वा न मिळो, मी तिकीटासाठी आलो नाही.”

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,  “दोन्ही नेते अनेक वर्षे पुण्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. सुतार कुटुंबाचा हिंदुत्वाशी जुना संबंध आहे. विकास आणि हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कार्यकर्त्यांना सन्मान देणारा पक्ष आहे. तिकीटाचा निर्णय अद्याप झालेला नाही.”

Local ad 1