...

Prashant Jagtap resignation : प्रशांत जगतापांचा शहराध्यक्षपदाला राजीनामा, महापालिका निवडणूक लढवण्याची घोषणा

Prashant Jagtap resignation पुणे : मागील दहा–बारा दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीदरम्यान अनेक वावड्या उठू लागल्या होत्या. पुढे कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत मनात घालमेल होती. मात्र आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि सर्वांचा आदर राखत मी पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “पुणेकरांच्या प्रश्नांसाठी माझी लढाई कायम सुरू राहील. मी आगामी पुणे महापालिका निवडणूक नक्की लढवणार आहे. माझा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (prashant jagtap resigns ncp pune city president pmc election)

 

 

२६ वर्षांचा राजकीय प्रवास

प्रशांत जगताप म्हणाले, “१९९९ साली हजारो कार्यकर्त्यांसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालो. तब्बल २६ वर्षे मला पक्षात काम करण्याची संधी मिळाली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता आले, यासाठी मी कायम ऋणी राहीन. पीएमसीपासून महापौर आणि शहराध्यक्षपदापर्यंतची संधी मला पक्षामुळेच मिळाली. सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले.”वानवडीतील नागरिकांनी नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहत आशीर्वाद दिले. माझा कोणावरही राग किंवा द्वेष नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मला संधी देणाऱ्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले.

 

 विजय–पराजयाची भीती नाही

“मी राजकारणात पेशा म्हणून आलो नाही. केवळ नगरसेवक व्हायचे म्हणून काम करणारा मी कार्यकर्ता नाही. मला विजय–पराजयाची भीती नाही. मी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो, मात्र पवार साहेबांचा उमेदवार असल्यामुळे मला एक लाखांहून अधिक मते मिळाली. कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने ही लढाई लढवली,” असे जगताप म्हणाले.

 

पक्षाबाबत भूमिका स्पष्ट

“मी पक्षाला धक्का बसेल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही. मी गुपचूप भाजपमध्ये गेलेलो नाही. सर्वांना सांगूनच हा निर्णय घेतला आहे. पवार कुटुंबाबाबत माझा आदर कायम आहे आणि पुढेही राहील. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्याकडे जाणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष कार्यालयावर माझा कोणताही दावा नव्हता आणि नसेल. मी पक्षाच्या भूमिकेवर टीका करणार नाही. सुप्रिया सुळे आणि एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी मला भरपूर वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मात्र माझ्या आणि नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची कुठेही वाच्यता केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

“राष्ट्रवादी काँग्रेस यापूर्वी ‘पुणे पॅटर्न’मध्ये भाजप आणि शिवसेनेसह सत्तेत सहभागी झाली होती. त्यावेळी तत्त्वांचा मुद्दा उपस्थित झाला नव्हता. त्या काळात मी सभागृहात नव्हतो, तर एक सामान्य कार्यकर्ता होतो. माझ्या कार्यकर्त्यांनी कुणीही पक्ष सोडू नये,” असे आवाहनही प्रशांत जगताप यांनी केले.

 

Web Title : Prashant Jagtap Resigns | Pune NCP City President Quits, PMC Election Fight

 

 

 

Local ad 1