...

दूषित पाण्यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात ? अनेक भागांत दूषित पाणी, सभागृहात संताप

 

पुणे : पुणे महानगरपालिकाच्या सभागृहात शहरातील बिघडलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर तीव्र चर्चा रंगली. शहर, उपनगर तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पाण्याची टंचाई आणि अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. नगरसेवकांनी प्रशासनावर निशाणा साधत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाल्याचा इशारा दिला. (pune water supply crisis contaminated water health risk)

 

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दबदबा ; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

 

 

सभागृहात विविध प्रभागांतील समस्या मांडताना ऐश्वर्या थोरात यांनी रविवार पेठ व काची आळी भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. रूपाली धाडवे यांनी बिबवेवाडी परिसरात अवघ्या १५ ते २० मिनिटांत दूषित पाणी येत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचे निदर्शनास आणले. पूजा जागडे यांनी प्रभाग १२ मध्ये नागरिकांना दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची “लाजिरवाणी परिस्थिती” असल्याचे म्हटले.

 

 

मृणाल कांबळे यांनी कासेवाडी, लोहिया नगर आणि डायस प्लॉट परिसरातील दूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. अश्विनी भंडारे यांनी नळजोडणी असूनही पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार केली. शैलजीत बनसोडे यांनी जुन्या व नव्या सोसायट्यांमध्ये असमान पाणीपुरवठा आणि नव्या प्रकल्पांना मंजुरी देताना होत असलेल्या अस्पष्टतेवर प्रश्न उपस्थित केले. नितीन गावडे यांनी दूषित पाण्यामुळे आरोग्य संकट उद्भवण्याचा इशारा दिला.

 

Pune ZP Budget 2026-27: ‘कौशल्य सेतू’ ते सायन्स पार्क ; शिक्षणाला सुपर बूस्ट

 

 

वडगावशेरी परिसरातही दूषित पाण्याची गंभीर समस्या असल्याचे समोर आले. नगरसेवक योगेश मुळीक यांनी तक्रारीनंतर केवळ पाहणी होते, मात्र ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली. कॅनॉल फुटल्यामुळे २०० नागरिक बेघर झाल्याच्या घटनेवर अजित घुले यांनी प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे नेते निलेश निकम यांनी पाणी वितरणातील असमानतेचा मुद्दा मांडला. अजय खेडेकर आणि सचिन मोरे यांनी कमी दाब व अपूर्ण जलटाक्यांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगितले.

 

दरम्यान, जल विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, १२ जलटाक्यांचे काम पूर्ण झाले असून काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. फर्ग्युसन टेकडी आणि कात्रज-कोंढवा रोड परिसरात काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुधारला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

सभागृहात झालेल्या चर्चेनंतर जलटाक्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, टँकर पुरवठ्यात पारदर्शकता आणणे, गळती रोखणे आणि पाण्याचा दाब सुरळीत ठेवणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. लवकर सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा नगरसेवकांनी दिला.

 

 

 

 

 

 

 

Local ad 1