जीवदान कार्यासाठी हरिदास वऱ्हाड यांचा राज्यस्तरीय गौरव; ‘आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

haridas-varhad-adarsh-maharashtra-gaurav-puraskar-2026-pune-security-guard-life-saving-award

पुणे, दि. १८ जुलै : समाजहितासाठी निस्वार्थपणे केलेल्या जीवदान कार्याची राज्यस्तरावर दखल घेत पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांना ‘राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान भारतीय इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथील वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या राज्यस्तरीय सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी हरिदास वऱ्हाड यांच्यासोबत त्यांची पत्नी दिपाली वऱ्हाड आणि चिमुकली कन्या अधिश्री वऱ्हाड याही उपस्थित होत्या. पुरस्कार स्वीकारताना कुटुंबासह रंगमंचावर उभ्या असलेल्या या कुटुंबाकडे उपस्थित मान्यवर व नागरि

कांचे लक्ष वेधले गेले. उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करून पुढील समाजसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
हरिदास वऱ्हाड यांनी खडकवासला धरण परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी धाडसी प्रयत्न केले आहेत. संकटसमयी दाखविलेली तत्परता, धैर्य, मानवता आणि सामाजिक बांधिलकी याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे, नुकताच त्यांच्या जीवदान कार्याचा गौरव माजी महापौर तथा माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांनी काँग्रेस कमिटीच्या वतीने केला होता. तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक संदीप बलकवडे यांनीही त्यांचा सन्मान केला असून, स्पंदन फाउंडेशनतर्फे त्यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. अल्पावधीतच विविध प्रतिष्ठित संस्थांकडून होत असलेला हा गौरव त्यांच्या कार्याची समाजात निर्माण झालेली विश्वासार्हता अधोरेखित करणारा मानला जात आहे.

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर हरिदास वऱ्हाड यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबाला, सहकाऱ्यांना आणि समाजसेवेसाठी प्रेरणा देणाऱ्या सर्व नागरिकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही जीव वाचविण्याचे आणि समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या पुरस्कारामुळे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्याचाही गौरव झाला असून, समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर सामान्य सुरक्षारक्षकही राज्यस्तरावर आपला ठसा उमटवू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांनी घालून दिले आहे.

Local ad 1