...

मुळशी धरणातून पुणे पश्चिम विभागाला पाणी मिळणार

बाबुराव चांदेरे व दत्तात्रय धनकवडे यांच्या मागणीला अखेर यश

पुणे | प्रतिनिधी
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाढता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे सूस, म्हाळुंगे सह पुणे शहराच्या पश्चिम भागाला मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यातील पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरासह सूस व म्हाळुंगे परिसरात झपाट्याने वाढणारी नागरी वस्ती, आयटी हबचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी दीर्घकालीन जलव्यवस्थापनाची आवश्यकता होती.

या पार्श्वभूमीवर, यापूर्वी पुणे शहराच्या उत्तर भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि पुणे मनपाचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुळशी धरणातून सूस, म्हाळुंगे सह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्याची मागणी लेखी स्वरूपात मांडली होती.

या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुळशी धरणातून वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी वेस्टेज पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रस्ताव मांडला. टाटा हायड्रो पॉवर कंपनीला सोलर व अन्य पर्यायी ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देत, वीज निर्मितीवर परिणाम न होता पुणे शहरासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत, यासाठी तातडीने समिती नेमून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे जाहीर केले होते. अखेर, राज्य मंत्रिमंडळाने मुळशी धरणातून सूस व म्हाळुंगे सह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला तत्वत: मंजुरी दिली आहे.

सूस टेकडीवर ‘वॉटर झोन’चा प्रस्ताव

या योजनेअंतर्गत सूस गावातील सर्वे नंबर २१६ येथील टेकडीवर १० ते १५ एकर क्षेत्र ‘वॉटर झोन’ म्हणून आरक्षित करण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. ही टेकडी तळजाई टेकडी पेक्षा अधिक उंच असल्यामुळे येथून संपूर्ण पुणे शहराला गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे महागडी पंपिंग व्यवस्था टाळता येऊन मोठ्या प्रमाणावर खर्चाची बचत होईल, असे जलतज्ज्ञांचे मत आहे.

“सूस व म्हाळुंगे परिसरातील वाढती लोकवस्ती आणि पाणीटंचाई लक्षात घेता मुळशी धरणातून पाणी आणण्याची मागणी आम्ही सातत्याने मांडत होतो. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला तत्वत: मंजुरी दिल्याने आमचा पाठपुरावा सफल झाला आहे. वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वेस्टेज पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करण्याचा निर्णय अत्यंत लोकहिताचा असून, यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना दीर्घकालीन दिलासा मिळणार आहे.” – बाबुराव चांदेरे (माजी अध्यक्ष, स्थायी समिती – पुणे मनपा)

“पुणे शहराच्या पश्चिम भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दिशेने हे ऐतिहासिक पाऊल आहे. अनेक वर्षांपासून आम्ही मुळशी धरणातून पाणी आणण्याची मागणी करत होतो. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घेतलेला हा निर्णय पुणेकरांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.” – दत्तात्रय धनकवडे (माजी महापौर, पुणे मनपा)

Local ad 1