...

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दबदबा ; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीरधवल जगदाळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर शिवसेना (ठाकरे गट) चे विजयसिंह शिंदे यांनीही अर्ज सादर केला होता. छाननीदरम्यान दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. (pune zilla parishad president vice president unopposed election)

 

उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे पाटील आणि शिवसेना (शिंदे गट) चे मंगेश काकडे यांनी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही अर्जांनाही छाननीत वैधता मिळाली.

 

Pune ZP Budget 2026-27: ‘कौशल्य सेतू’ ते सायन्स पार्क ; शिक्षणाला सुपर बूस्ट

 

यानंतर उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेले विजयसिंह शिंदे आणि उपाध्यक्ष पदासाठी अर्ज केलेले मंगेश काकडे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठी निवडणूक बिनविरोध झाली असल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केली.

 

 

सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर जिल्हा परिषदेला नवे नेतृत्व मिळाले आहे. दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यासह गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आला.

राजकीय पार्श्वभूमी पाहता, वीरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातील खडकी परिसरातून तिसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते दौंड नगरपालिकेत नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच ते जिल्हा कबड्डी संघाचे उपाध्यक्ष आणि दौंड साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. वीरधवल जगदाळे यांचा राजकीय प्रवास १९९२ मध्ये नगरसेवक म्हणून सुरू झाला. पहिल्याच कार्यकाळात ते नगराध्यक्ष झाले आणि सुमारे ३४ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आता जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

विवेक वळसे पाटील हे दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले असून, यापूर्वीही त्यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सध्या ते शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत.

“जर अजितदादा आज आपल्या सोबत असते तर त्यांचा आनंद दुप्पट झाला असता. दादा म्हणजे दादा होते. ते इतक्या लवकर जातील, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेला सर्वसामान्यांची संस्था म्हणून देशभर ओळख मिळवून दिली. ते नेहमी म्हणायचे – ‘रडत बसू नका, उठा आणि कामाला लागा.’ नव्या सदस्यांनी थांबू नये, तर दुप्पट जोमाने काम करावे.”
वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

“अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कुणीही भरून काढू शकत नाही. आम्ही सर्वजण दादांनी निवडून दिलेले शेवटचे सदस्य आहोत. ही जबाबदारी लक्षात घेऊन अधिक मेहनतीने काम करणे आवश्यक आहे.”
विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

 

Local ad 1