टँकर अपघातांवर लगाम : पुणे मनपा आणणार कडक नियम, SCADA सक्तीचे

पुणे : शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासन आता कडक पावले उचलणार आहे. टँकर संचालनासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असून, सर्व टँकरसाठी ‘SCADA’ प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (pune tanker accident control scada pmc new rules)

 

साधू वासवानी पूल वाद: महापालिका-वाहतूक पोलीस आमने-सामने, विलंबावरून आरोप-प्रत्यारोप

स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा झाली. पाणी टँकरमुळे होणारे अपघात, केशवनगर–मुंढवा परिसरातील गोठ्यांच्या जागांची अवैध विक्री, तसेच शहरातील अनधिकृत होर्डिंग यांसारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले. या सर्व मुद्द्यांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

टँकर संदर्भात प्रशासनाकडे सतत तक्रारी येत असून, पाणीपुरवठा मनमानी पद्धतीने केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांत टँकर अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नव्या SOP अंतर्गत टँकर चालकांचा परवाना, टँकरच्या फेऱ्या (ट्रिप), वेळापत्रक यांची नोंद ठेवली जाणार आहे. तसेच SCADA प्रणालीमुळे टँकरच्या हालचालींवर रिअल-टाइम नियंत्रण ठेवता येणार असून, गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

 

अलर्ट : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात लागू शकते ; काय कारण जाणून घ्या..

दरम्यान, गोठे स्थलांतराच्या मुद्द्यावरही गंभीर चर्चा झाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील गाई-म्हशींचे गोठे मुंढवा–केशवनगर परिसरात हलविण्यासाठी जागा देण्यात आली होती. मात्र अद्याप स्थलांतर पूर्ण झाले नसून, काही ठिकाणी त्या जागांवर अनधिकृत बांधकाम करून विक्री केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी टँकर अपघातांवर चिंता व्यक्त केली, तर वैशाली बनकर यांनी अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला. स्थायी समितीने शहरातील सर्व अधिकृत व अनधिकृत होर्डिंगची माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होर्डिंग व्यावसायिकांकडून शुल्क वसुली करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

पालखी विठोबा मंदिरासाठी 10 कोटींचा प्रस्ताव
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात सुविधा विकसित करण्यासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत आवश्यक जागा ताब्यात घेऊन सुविधा उभारण्याचे नियोजन असून, पालखी मार्गाची देखभाल व दुरुस्तीही केली जाणार आहे.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला गती
आगामी पावसाळा लक्षात घेता शहरातील पाणी तुंबणे टाळण्यासाठी नालेसफाई व जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. नाल्यांमधील गाळ काढणे, वहन क्षमता वाढवणे आणि सखल भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहराच्या सीमांवर भव्य प्रवेशद्वार
शहराची ओळख अधिक ठळक करण्यासाठी पुण्याच्या सीमांवर भव्य प्रवेशद्वार उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत.

Local ad 1