...

साधू वासवानी पूल वाद: महापालिका-वाहतूक पोलीस आमने-सामने, विलंबावरून आरोप-प्रत्यारोप

 

पुणे, कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पुलाच्या कामावरून पुणे महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. कामाच्या गतीवरून दोन्ही यंत्रणा आमने-सामने आल्या असून, विलंबाच्या कारणांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (sadhu vaswani bridge pune delay controversy municipal vs traffic police)

 

कोरेगाव पार्क आणि लष्कर परिसराला जोडणारा सुमारे ५० वर्षे जुना साधू वासवानी पूल धोकादायक ठरत असल्याने तो पाडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भूमिपूजनानंतर विविध विभागांच्या परवानग्यांमुळे काम दीर्घकाळ रखडले.सध्या पुलाचे काम सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागत असून, परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

 

 

नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर देताना वाहतूक पोलिसांकडून परवानगी देण्यात दीड वर्षांचा विलंब झाल्याचा दावा केला आहे. महापालिकेच्या मते, रेल्वे विभागाच्या परवानगीनंतर पुलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर मुख्य जलवाहिनी भूमिगत करण्याचे काम सुरू झाले. मात्र, वाहतूक पोलीसांकडून आवश्यक परवानग्या उशिरा मिळाल्याने कामावर परिणाम झाला.

 

दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या वेळापत्रकानुसारच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पात कोणताही विलंब झाला नसून, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

 

“वाहतूक पोलिसांकडून या कामासाठी दीड वर्षे परवानगी देण्यात आली नव्हती. जुलै २०२५ मध्ये काम सुरू झाले असून अद्याप एक वर्ष पूर्ण झालेले नाही. काम रेल्वे प्रशासनाच्या वेळापत्रकानुसार सुरू आहे.”
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

Local ad 1