पुणे, दि. ९ एप्रिल : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत, खाजगी तसेच पुणे महानगरपालिका संचलित आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) आणि डांबर (हॉटमिक्स) प्लांट शहराबाहेर हलविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यासोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (pune rmc hotmix plant shift outside city pmc decision)
नगरसेवक हरिदास चरवड यांनी वडगाव परिसरातील आरएमसी प्लांटमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. दाट लोकवस्तीच्या भागात सुरू असलेले हे प्लांट नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांना तातडीने स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. या प्रस्तावावर झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाला कारवाईचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
भिमाले यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आरएमसी आणि हॉटमिक्स प्लांट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. तसेच येत्या काळात शहराच्या हद्दीबाहेर, कमी लोकसंख्या असलेल्या भागात हे प्रकल्प हलविण्यासाठी खाजगी व्यावसायिकांना देखील आवाहन करण्यात येणार आहे.
दरम्यान, महापालिकेचे येरवडा येथे असलेले डांबर प्लांटदेखील टप्प्याटप्प्याने शहराबाहेर हलविण्यात येणार आहेत. शहराच्या चारही कोपऱ्यांमध्ये नव्या प्लांट्सची उभारणी करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. शिंदेवाडी जकात नाका आणि वाघोली येथे नवीन प्लांट उभारण्याबाबत पुढील सहा महिन्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

