पुणे, बाणेर–पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे परिसरात निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग आणि नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज औंध क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त समन्वय बैठक पार पडली. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीस औंध क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी विजय नायकल, पासपोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधी जतिन कोटे, माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, तसेच स्थानिक नागरिक आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (baner pashan passport seva kendra traffic issues meeting pune)
साधू वासवानी पूल वाद: महापालिका-वाहतूक पोलीस आमने-सामने, विलंबावरून आरोप-प्रत्यारोप
पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरात वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरील अतिक्रमणे, पादचारी सुरक्षेचे प्रश्न आणि वाहतूक नियंत्रणाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयातून नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच यासाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
बैठकीतील प्रमुख निर्णय
* या आठवड्यात महापालिका, वाहतूक विभाग आणि पासपोर्ट कार्यालयाचा संयुक्त पाहणी दौरा
* पाहणी अहवालावर आधारित सविस्तर मास्टर प्लॅन तयार केला जाणार
* एप्रिल अखेर आराखडा सर्व संबंधितांसमोर सादर केला जाणार
* टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीसाठी कार्ययोजना निश्चित केली जाणार
“समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. पासपोर्ट सेवा केंद्र ही महत्त्वाची सुविधा असली तरी परिसरातील वाहतूक व नागरी व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.”
— सनी निम्हण, नगरसेवक

