पुणे, कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर त्याला पासपोर्ट कसा मिळाला, यावरून देशभरात पासपोर्ट यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेत संशयास्पद पत्त्यांच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा सखोल पोलिस पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती पुणे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली. (pune passport office strict verification after nilesh ghaywal case)
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन पासपोर्ट काढणे तसेच नूतनीकरणासाठी चार दिवसांचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी उप पासपोर्ट अधिकारी सृष्टी पांडे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, तसेच आशिष देशमुख, दत्तात्रेय अढागळे आणि पासपोर्ट कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी जतीन पोटे उपस्थित होते.
या विशेष शिबिरात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची पासपोर्ट प्रक्रिया अवघ्या चार दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. शिबिरानिमित्त आयोजित संवाद सत्रात डॉ. गायकवाड यांनी राजदूत म्हणून रशिया, कुवेत आणि फ्रान्स येथे काम करताना आलेले अनुभव, बदलती शासकीय धोरणे आणि परदेशातील भारतीयांची प्रतिमा याबाबत माहिती दिली. प्रश्नोत्तर सत्रात पत्रकारांनी विविध प्रशासकीय मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.
निलेश घायवळ प्रकरणानंतर ज्या पत्त्यांवर पोलिसांनी “कोणी वास्तव्यास नाही” असा शेरा दिला आहे, अशा सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याचे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच बनावट कागदपत्रे, खोटा पत्ता किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, आगामी काळात ई-पासपोर्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असून सन 2035 पर्यंत सर्व पासपोर्ट ई-पासपोर्टमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

