...

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली

“मी प्रगतिशील विचारधारेचा आहे” – काँग्रेस प्रवेशानंतर जगतापांची प्रतिक्रिया

prashant jagtap joins congress : पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाबाबत पक्ष नेतृत्वाशी मतभेद वाढल्यानंतर जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी हा सस्पेन्स संपला.

 

मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे काँग्रेसची सदस्यता स्वीकारली. त्यांच्या प्रवेशामुळे पुण्यातील राजकारणात नवी खळबळ उडाली असून आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या घडामोडीचा काँग्रेसला नेमका किती फायदा होतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

 

प्रशांत जगताप हे दीर्घकाळ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय नेते होते. पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी मोठे योगदान दिले होते. मात्र अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद वाढत गेले. त्यातूनच त्यांनी पदाचा राजीनामा देत वेगळा राजकीय मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

 

जगताप यांचा काँग्रेस प्रवेश हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून एक संघटित राजकीय पाऊल मानले जात आहे. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची चर्चा आहे. हे कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या गणितावर होऊ शकतो.

 

 

स्थानिक नेतृत्व अंधारात?

गेल्या दोन दिवसांपासून प्रशांत जगताप कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावर जोरदार चर्चा सुरू होती. गुरुवारी काँग्रेसचे काही पदाधिकारी मुंबईत दाखल झाले होते. त्याच दरम्यान जगताप प्रदेश काँग्रेस कार्यालयात दिसून आल्याने त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेची पूर्वकल्पना स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी व गटबाजी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रवेशामागे एका माजी आमदाराची महत्त्वाची भूमिका असल्याचाही उल्लेख राजकीय वर्तुळात होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जगताप यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती; मात्र त्यांनी आभार मानत ती नाकारली.

 

 

“मी प्रगतिशील विचारधारेचा आहे” – प्रशांत जगताप

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत जगताप यांनी सोशल मीडियावर भावनिक फेसबुक पोस्ट शेअर केली. प्रगतिशील विचारांच्या प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी नमूद केले. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समतावादी समाज घडवणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसची ऐतिहासिक भूमिका तसेच आजही धार्मिक व जातीय द्वेषाविरोधात काँग्रेस करत असलेला संघर्ष, याच कारणांमुळे आपण हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

 

काँग्रेसच्या ताकदीत वाढ

प्रशांत जगताप यांच्यासह अनेक अनुभवी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने पक्षाची संघटनात्मक आणि निवडणूकपूर्व ताकद वाढण्याची चिन्हे आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, जगताप यांचा प्रशासकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि त्यांच्यासोबत आलेले कार्यकर्त्यांचे जाळे काँग्रेससाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पुण्यात काँग्रेस अधिक मजबूत स्थितीत जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

 

Local ad 1