ऐन निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का; ४० वर्षांचे निष्ठावंत मुख्तार शेख पुत्रासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची ताकद मानले जाणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मुख्तार शेख यांनी आपल्या मुलगा विकार शेख यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. (pune municipal election mukhtar sheikh joins ncp ajit pawar)
मुख्तार शेख हे गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ होते. या काळात त्यांनी दोन वेळा नगरसेवक म्हणून पुणे शहराचे प्रतिनिधित्व केले. पुणे काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
सत्तेचा फायदा, संघटनेची ताकद : अजित पवारांचा पुणे जिल्ह्यातील विजयमार्ग सुखर !
“काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक समाजाला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना योग्य संधी दिली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे,” अशी स्पष्ट नाराजी मुख्तार शेख यांनी व्यक्त केली.
अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
पुण्याच्या मध्यवर्ती भागात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या शेख पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडल्याने पुण्यातील काँग्रेसच्या व्होटबँकेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची शहरातील ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना, ४० वर्षांचा निष्ठावंत नेता काँग्रेसमधून बाहेर पडणे हे काँग्रेससाठी मोठे राजकीय आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.

