...

शहरी गरीबांसाठी मोठी बातमी ! योजनेचे नाव बदलण्याची मागणी ? जाणून घ्या नेमकी ‘ही’ योजना काय आहे ?

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 2009 पासून राबविण्यात येणाऱ्या ‘शहरी गरीब आरोग्य योजने’चे नाव बदलून ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजना’ असे करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते अ‍ॅड. निलेश निकम यांनी केली आहे. योजनेसाठी निधी वाढविण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला असून, यासंदर्भात मनपा आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. (ajitdada pawar shahari garib arogya yojana pune demand)

निकम यांनी सांगितले की, या योजनेद्वारे आतापर्यंत हजारो आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रशासनाने ही आरोग्य सुविधा सातत्याने यशस्वीपणे सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या योजनेला त्यांचे नाव देणे उचित ठरेल.

सध्या या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत असलेल्या पुणेकरांना उपचारासाठी 1 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. कर्करोग रुग्णांसाठी ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपये करण्याची आणि सामान्य रुग्णांसाठी मदत रक्कम 2 लाख रुपये पर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कर्करोग, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार आणि गंभीर मज्जासंस्था विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी 5 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

नागरिकांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणाऱ्या अजितदादा पवार यांना पुणेकरांकडून हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे निकम यांनी नमूद केले. दरम्यान, मनपाकडून 2026–27 च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू असल्याने या सर्व प्रस्तावांचा समावेश बजेटमध्ये करून आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी विनंतीही आयुक्तांना करण्यात आली आहे.

काय आहे ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ ?
 पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत चालवली जाणारी आर्थिक वैद्यकीय मदत योजना आहे. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने ही योजना सुरू करण्यात आली. गरीब व कमी उत्पन्न गटातील नागरिकांना गंभीर आजारांवर उपचार करताना आर्थिक आधार देणे हा आहे.

कोणाला लाभ मिळतो?
* पुणे शहरातील रहिवासी
* ठराविक उत्पन्न मर्यादेखालील कुटुंबे
* वैद्यकीय उपचारांची गरज असलेले रुग्ण

सध्या मिळणारी मदत
* वार्षिक उत्पन्न ₹1.60 लाखांपर्यंत असलेल्या नागरिकांना
₹1 लाखांपर्यंत उपचारासाठी मदत
कर्करोग रुग्णांसाठी ₹2 लाखांपर्यंत मदत

कोणत्या उपचारांसाठी उपयोगी?
* मोठ्या शस्त्रक्रिया
* गंभीर आजारांवरील रुग्णालयीन उपचार
* कर्करोग उपचार
* इतर महागडे वैद्यकीय उपचार

‘शहरी गरीब आरोग्य योजने’ला अजितदादा पवार यांचे नाव देण्याची मागणी; मदत रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव

पुणे मनपाच्या शहरी गरीब आरोग्य योजनेचे नाव ‘अजितदादा पवार’ करण्याची मागणी. उत्पन्न मर्यादा 3 लाख व गंभीर आजारांसाठी 5 लाखांपर्यंत आर्थिक मदतीचा प्रस्ताव आयुक्तांना सादर.

Local ad 1