पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी हातभट्टी दारू प्रकरणात मृत्यूंची संख्या वाढल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. (pune pimpri toxic liquor case police suspension excise department demand marathi news)
Pune Pimpri Chinchwad illicit liquor case विषारी दारूमुळे पुणे-पिंपरी चिंचवड हादरले !
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर चौकी प्रमुख हसीना शिकलगार आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित केले आहे. २१ मे २०२६ रोजी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी आणि विषारी दारू सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
विभागीय चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि देखरेखीत गंभीर त्रुटी ठेवल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्री सुरू असल्याची माहिती असूनही प्रभावी कारवाई न केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिनियम कलम २५ आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली असून निलंबन काळात संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त कार्यालय मुख्यालयाशी संलग्न राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरातील प्रकरणात दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे, उपनिरीक्षक राजू भास्कर आणि अन्य चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानंतर उशिरा रात्री निलंबन आदेश जारी करण्यात आले. या कारवाईमुळे दोन्ही पोलीस दलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायाला उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिलेल्या निवेदनात सुरवसे-पाटील यांनी म्हटले आहे की, हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या दोन दिवसांत विषारी दारू सेवनामुळे सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असली तरी त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसाय सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमका काय करत होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आश्रयाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध दारू व्यवसाय सुरू राहू शकत नाही,” असा गंभीर आरोप करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनाही पाठविण्यात आल्या आहेत. विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून, अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

