Pune Pimpri Chinchwad illicit liquor case पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी स्पिरिटयुक्त गावठी दारू प्यायल्याने प्राथमिक माहितीनुसार १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अनेक नागरिक गंभीर अवस्थेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर परिसरात दोन अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारू प्यायल्यानंतर संबंधितांना चक्कर येणे, तोंडाला फेस येणे आणि अचानक प्रकृती खालावणे अशी लक्षणे दिसून आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने स्पिरिट मिसळून विषारी दारू तयार केल्याचा आरोप आहे. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत विकली गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठी घबराट पसरली आहे. याच भागातील आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गेल्या ४८ तासांत एकूण ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून फुगेवाडीतील आणखी तिघांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मृतांपैकी पाच जणांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचा दावा केला आहे. मात्र, मृत्यूपूर्वी बहुतांश नागरिकांना तीव्र चक्कर येत असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उर्वरित मृत्यू आणि उपचाराधीन रुग्णांची प्रकृती नेमकी विषारी दारूमुळेच बिघडली का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र काही मृत्यूंची कारणे वेगळी असल्याचा दावा केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

