pune toxic liquor case : राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित

 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैध दारू व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांवरून विभागातील तब्बल १३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकाचवेळी निलंबित करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.  (pune toxic liquor case 13 excise officers suspended marathi news)

 

Pune Pimpri Chinchwad illicit liquor case विषारी दारूमुळे पुणे-पिंपरी चिंचवड हादरले !

 

 

याआधी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने संबंधित प्रकरणात ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘J’ आणि ‘F’ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. अवैध हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री सुरू असल्याची माहिती असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी कारवाई न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. अवैध दारू व्यवसाय इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

 

 

 

 

 

 

 

Local ad 1