PMC Footpath Cleaning Squad। सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त फुटपाथसाठी पुण्यात ‘फुटपाथ क्लिनिंग पथक’
महापालिकेसह पोलिसांचा सहभाग; ११० कोटींच्या निधीतून विशेष मोहीम
पुणे : शहरातील पदपथ सुरक्षित, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी पुणे महापालिकेने आता विशेष ‘फुटपाथ क्लिनिंग (देखरेख) पथक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात महापालिकेच्या विविध विभागांसह पोलिस विभागाचाही समावेश असणार असून, पदपथांवरील अतिक्रमण, बेकायदेशीर टपऱ्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.
ACB Pune News। एक लाखाची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे शहरात सुमारे १८०० किलोमीटर लांबीचे रस्ते असून, पादचाऱ्यांसाठी जवळपास २५० किलोमीटर लांबीचे पदपथ विकसित करण्यात आले आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये व्यावसायिक, भाजी विक्रेते, खाद्यपदार्थ स्टॉलधारक आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने नागरिकांना पदपथाऐवजी मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे.
मागील काही वर्षांत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते अरुंद करून पदपथ मोठे करण्याचे काम करण्यात आले. मात्र, याच पदपथांवर अतिक्रमण वाढल्याने पादचाऱ्यांची गैरसोय अधिकच वाढली आहे. शिवाय विविध केबल, पाणी व इतर वाहिन्यांच्या कामांसाठी पदपथ वारंवार खोदले जात असल्याने अनेक ठिकाणी पदपथांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ‘फुटपाथ क्लिनिंग पथक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल ११० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे पथक पदपथांची दुरुस्ती, स्वच्छता आणि अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे.
या पथकात पथ विभाग, शहर अभियंता विभाग, क्षेत्रीय कार्यालये, अतिक्रमण विभाग, विद्युत विभाग तसेच पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. पथकासाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असून, अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पदपथांवरील बेकायदेशीर हालचालींवर थेट नजर ठेवली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख पदपथांचे सविस्तर सर्वेक्षण केले जाईल. कुठे अतिक्रमण आहे, कुठे दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि कोणत्या भागात नागरिकांना अधिक अडचणी येत आहेत, याचा अहवाल तयार करून त्यानुसार तातडीने प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील पादचाऱ्यांना सुरक्षित आणि मोकळे पदपथ उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

