Pune toxic liquor case व्हिडीओ । हडपसरमध्ये शिवसेनेचा अवैध दारू हातभट्ट्यांवर हल्लाबोल ; शेकडो लिटर बनावट दारू नष्ट
Pune toxic liquor case । पुणे : पुणे शहरात विषारी दारूमुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर शहरभर संतापाची लाट उसळली असताना शिवसेनेने हडपसर परिसरातील अवैध दारू व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. हडपसर मतदारसंघातील कृष्णानगर, तरवडे वस्ती पोलीस चौकीच्या पाठीमागील परिसर तसेच साठे वस्ती भागात सुरू असलेल्या गावठी व बनावट दारूच्या हातभट्ट्यांवर शिवसैनिकांनी तुफान हल्लाबोल चढवला. (hadapsar illegal liquor shivsena action pramod bhangire pune)
pune toxic liquor case : राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करत हातभट्ट्या फोडून टाकल्या. यावेळी बनावट गावठी दारूचा शेकडो लिटरचा अवैध साठाही नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
यावेळी बोलताना प्रमोद नाना भानगिरे यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सर्वसामान्य नागरिकांना अवैध दारू हातभट्ट्या आणि त्यावरील खुले व्यवहार स्पष्ट दिसतात, मग पोलिसांना ते का दिसत नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी केला.
भानगिरे यांनी आरोप केला की, शहरातील अनेक भागांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेले हे अवैध धंदे पोलिसांच्या माहितीसह सुरू असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय अशा प्रकारे खुलेआम दारूभट्ट्या चालू शकत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, याचे उत्तर पुणे पोलिसांनी जनतेसमोर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हडपसर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री, हातभट्ट्या आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात शिवसेना सातत्याने आवाज उठवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विषारी दारूकांडात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतरही अवैध दारू विक्री सुरू राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यापुढे दारू माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला. पुणे शहरात अवैध दारू व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कारवाईवेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

