...

BJP Pune : पक्षप्रवेशासाठी कोअर कमिटी मंजुरी अनिवार्य

पुणे, पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांबाबत आता आमदार आणि कोअर कमिटीची सहमती घेतल्याशिवाय प्रवेश दिले जाणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय शहर भाजपच्या बैठकीत घेण्यात आला. रविवारी झालेल्या शहर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षप्रवेशांवरून तीव्र मतभेद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आठ वर्षांनंतर महापालिका निवडणुका होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. (bjp pune core committee party entry decision)

 

 

पुणे महापालिकेचा कारनामा : एका खड्ड्यासाठी ₹50 हजार खर्च?

 

पक्षात प्रवेश इच्छिणाऱ्यांकडून विविध भागांत फ्लेक्सबाजी सुरू झाल्यामुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. इतर पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना थेट प्रवेश दिल्याने अंतर्गत असंतोष वाढल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. विशेषतः वारजे परिसरात एका व्यक्तीस दिलेल्या पक्षप्रवेशावर एका आमदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली. पक्षाकडे ४२ जणांची प्रवेश यादी तयार असल्याच्या चर्चेमुळे इतर आमदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून पुढील काळात कोणालाही पक्षप्रवेश देण्याआधी आमदार आणि कोअर कमिटीची मंजुरी आवश्यक असावी, असा ठराव करण्यात आला.

 

IndiGo प्रवाशांना अतिरिक्त शुल्क न घेता पूर्ण तिकीट रिफंड द्या – मुरलीधर मोहोळ.

 

भाजपने यापूर्वी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती, मात्र आता महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. तरीही अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल, असे सांगत संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. यावेळी मोहोळ यांनी सांगितले की, आगामी जाहीरनामा तयार करताना नागरिकांच्या घराघरात जाऊन शहर विकासाबाबत सूचना घेतल्या जातील. तसेच प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

 

या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीच्या तयारीसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याची आमची भूमिका आहे, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.”

 

पक्षप्रवेशावर स्पष्ट भूमिका

मित्रपक्षातील इच्छुकांना प्रवेश देण्याबाबत मोहोळ म्हणाले, “जिथे एकमत होईल तिथेच प्रवेश दिले जातील. जिथे पक्ष कार्यकर्ता सक्षम असेल, तिथे कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिले जाईल.”

 

आजपासून अर्ज विक्री
भाजपकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुकांकडून आजपासून अर्ज मागविण्यात येणार असून मंगळवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज शहर कार्यालयात स्वीकारले जातील व प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात येतील.

 

 

 

 

 

 

Local ad 1