...

सभापती निवडीत ‘गेमचेंजर’ निर्णय ; शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली !

 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड गुरुवारी (२ एप्रिल) बिनविरोध पार पडली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून निवडून आलेल्या अंकिता पाटील-ठाकरे यांची निवड करण्यात आली. तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील उरळी कांचन गटाचे जितेंद्र बढेकर यांची निवड झाली. याशिवाय, मावळ तालुक्यातील खडकाळे गटातून दीपाली हुलावळे आणि वेल्हे तालुक्यातील विंझर गटातून अमोल नलावडे यांचीही सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांचे विषय वाटप करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, नव-निवडीत सभापतींना १६ एप्रिल रोजी कार्यभार देण्यात येणार असून, त्याच दिवशी विशेष सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या सदस्यांची निवडही केली जाणार आहे. निवड झालेल्या सभापतींपैकी अमोल नलावडे आणि अंकिता पाटील हे दुसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आले आहेत, तर दीपाली हुलावळे आणि जितेंद्र बढेकर हे प्रथमच जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत. या निवड प्रक्रियेदरम्यान हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

 

इंदापूरची बाजी
सभापती निवडीसाठी पूर्वनियोजित सूत्रात ऐनवेळी बदल करण्यात आला. बारामतीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र अखेर इंदापूरला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे इंदापूर तालुक्याने या निवडीत बाजी मारली.

 

भोरच्या खुटवड यांनी नकार दिला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना सभापतीपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची अधिकृत घोषणा देखील झाली होती. मात्र खुटवड यांनी ही जबाबदारी नाकारल्यानंतर त्यांच्या जागी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांना संधी देण्यात आली.

 

आमदारांची मागणी फेटाळली
मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत काही विद्यमान व माजी आमदारांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांना सभापतीपद देऊ नये, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी डावलून कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.

 

“स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध निवडीची परंपरा सुरू झाली आहे. ही परंपरा पुढील पाच वर्षे कायम ठेवावी,” असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केले.  

 

 

 

 

 

 

 

 

Local ad 1