पुणे ZP कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक; सभापतींना व्यासपीठावर स्थान नाही

 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात मानपानावरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. ११ एप्रिल) पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती असूनही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (pune zp school inauguration controversy ajit pawar photo issue)

 

 

आता ‘डिप्युटेशन राज’ संपणार? महसूल विभागाचे नवे नियम लागू

 

 

या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आठ कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष उपस्थित होते. मात्र, व्यासपीठावरील जागेच्या वाटपावरून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसून आले.

 

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर ही शाळा उभारण्यात आली असून महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्याच वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांसाठी हा ‘घरचा कार्यक्रम’ असतानाही त्यांना अपेक्षित मान मिळाला नसल्याची चर्चा रंगली.

 

कार्यक्रमादरम्यान काही सभापतींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, तर काही जिल्हा परिषद सदस्यांना प्रवेश मिळालाच नसल्याचा आरोप करण्यात आला. समाजकल्याण सभापती जितेंद्र बढेकर यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत व्यासपीठावर जाण्यास नकार दिला. तसेच अमोल नलावडे यांनीही नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी विनंती करूनही त्यांनी व्यासपीठावर जाणे टाळले.

 

टँकर अपघातांवर लगाम : पुणे मनपा आणणार कडक नियम, SCADA सक्तीचे

 

 

दरम्यान, या शाळेच्या उभारणीत दिवंगत अजित पवार यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले जाते. मात्र, उद्घाटन सोहळ्यात त्यांचे छायाचित्र न लावल्यानेही वाद निर्माण झाला. याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

 

याशिवाय, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले असले तरी त्यांना दुय्यम स्थान मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अध्यक्षांना पहिल्या रांगेत कोपऱ्यात बसविण्यात आल्यानेही नाराजी वाढली.

Local ad 1