Pune Zilla Parishad President | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील
पुणे : तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय कालखंडानंतर पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पुणे जिल्हा परिषदेला अखेर नवे नेतृत्व मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना मिळालेल्या निर्विवाद बहुमतामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर त्यांच्याच उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदासाठी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची नावे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहेत. या निवडीमुळे पक्षातील अंतर्गत चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित करण्याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षांसाठी ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित असल्यामुळे अनुभवी सदस्याला संधी मिळणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर वीरधवल जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया आजच पार पडणार असून सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दुपारी ३ वाजता विशेष सभेत अर्जांची छाननी होईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ‘हात उंचावून’ मतदान घेतले जाईल, तर एकच अर्ज आल्यास निवड बिनविरोध घोषित केली जाईल. या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

