सुनेत्रा पवारांचा बारामतीत ऐतिहासिक विजय

बारामती पोटनिवडणुकीत 2 लाख 14 हजारांहून अधिक मतांनी विजय

 

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वाधिक मताधिक्याच्या विक्रमालाही मागे टाकत सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2 लाख 14 हजार 93 मतांच्या फरकाने विजय संपादन केला. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना एकूण 2 लाख 18 हजार 930 मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 22 उमेदवारांसह ‘नोटा’ला मिळून केवळ 4 हजार 837 मते मिळाली. प्रमुख विरोधी पक्ष मैदानात नसल्याने ही निवडणूक सुरुवातीपासूनच एकतर्फी मानली जात होती. मात्र, सुनेत्रा पवार अजित पवारांचा विक्रम मोडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (sunetra pawar record win baramati bypoll breaks ajit pawar margin record)

 

Pune Crime News : कॅबिनेट मंत्र्याच्या OSD कडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्यात गुन्हा दाखल

 

 

याआधी बारामतीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा 1 लाख 65 हजार 265 मतांनी पराभव केला होता. सुनेत्रा पवार यांनी हा विक्रम सुमारे 50 हजारांहून अधिक मतांनी मागे टाकला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर बारामती मतदारसंघ रिक्त झाला होता. त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र 22 उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान प्रक्रिया पार पडली.

 

 

आरोपी मोबाईल वापरतच नव्हता ; मग पोलिसांच्या हाती लागला कसा ? नसरापूर प्रकरणाचा खुलासा ?

 

 

बारामतीतील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या गोदामात मतमोजणी पार पडली. टपाल मतपत्रिकांपासूनच सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळू लागली. पहिल्या फेरीत 8 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतलेल्या सुनेत्रा पवार यांची आघाडी प्रत्येक फेरीत वाढत गेली. 24 व्या फेरीअखेर त्यांचा विक्रमी विजय निश्चित झाला.

 

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण 23 उमेदवार मैदानात होते. यामध्ये करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह 20 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. मात्र, सर्व उमेदवार आणि नोटा मिळूनही 5 हजार मतांचा आकडा ओलांडू शकले नाहीत. निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले. विजय मिरवणूक, गुलाल आणि फटाके टाळण्याचे आवाहन करत त्यांनी हा क्षण उत्सवाचा नसून भावनिक जबाबदारीचा असल्याचे म्हटले.

 

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा निकाल भावनिक आहे. अजितदादांच्या विचारांनुसार संयम आणि जबाबदारी राखणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

 

64 वर्षांनंतर बारामतीला पुन्हा महिला आमदार
बारामतीला 64 वर्षांनंतर पुन्हा महिला आमदार मिळाल्या आहेत. यापूर्वी 1962 मध्ये मालतीबाई शिरोळे या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांना परिसरात प्रेमाने ‘माई’ म्हणून ओळखले जात असे. आता सुनेत्रा पवार बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. गेल्या तीन दशकांपासून स्थानिकांमध्ये ‘वहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील सक्रिय सहभागातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, बारामतीकरांनी ‘माई’नंतर आता ‘वहिनी’वर विश्वास दाखवला आहे.

 

 

 

 

या निवडणुकीत प्रा. आर. वाय. घुटुकडे (नवीन राष्ट्रीय समाज पार्टी) यांना ९३५ मते, तर सतीश कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी) यांना १७० मते मिळाली. अपक्ष उमेदवारांमध्ये डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (३३३), ॲड. अविनाश वामनराव गायकवाड (९२), करुणा धनंजय मुंडे (३०१), गजानन शांताबाई उत्तम गवळी पाटील (४७), चंद्रकांत रंभाजी मोटे (४२), चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (४०३), दत्तात्रय रावसो बेदरे (४३), बाळासो मारुती धापटे (५७), रोहित राजू भोसले (७०), मिथुन सोपानराव आटोळे (१२३), मंगलदास तुकाराम निकाळजे (१३७), योगेश मोहन योमो (५०), डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे (२९८), विराज महादेव शिंदे (५३३), शिवाजी जयसिंग कोकरे (१४६), सतीश नाना सोनवणे (४८), सागर शरद भिसे (४५), साजन भगवान अडसूळ (८५), सिताराम विठ्ठल रणदिवे (४५) आणि सोनाली सूर्यकांत राणे (१३२) यांनी मते मिळवली. ‘नोटा’ला ७७४ मते मिळाली.

Local ad 1