नसरापूर प्रकरणावर युवक काँग्रेस आक्रमक; धायरीत रास्ता रोको

पीडितेला तातडीने न्याय, आरोपींवर कठोर कारवाई आणि फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीची मागणी

 

पुणे : नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुणे ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे धायरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पीडितेला तातडीने न्याय मिळावा, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात घेऊन अल्पावधीत निकाल द्यावा, या मागण्यांसाठी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. (nasrapur case youth congress rasta roko protest dhayari pune)

 

 

सुनेत्रा पवारांचा बारामतीत ऐतिहासिक विजय

 

 

आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासन आणि युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी संबंधित प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून 15 ते 20 दिवसांत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर युवक काँग्रेसने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

 

याबाबत माहिती देताना पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार म्हणाले, “पीडित कुटुंबाला न्याय मिळणे हीच आमची प्राथमिकता आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाचा मान राखत आम्ही सध्या आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र, दिलेल्या कालावधीत न्याय मिळाला नाही, तर युवक काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन उभारेल.”

 

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, जिल्हा उपाध्यक्ष सूरज कारदगे, सरचिटणीस भूषण रानबरे, आनंद दुबे, मेघशाम धर्मावत, सुमित शिंदे, प्रदेश सचिव विकास सुपनार, विश्वजीत जाधव, धवलसिंह लावंड, नेहल देशमुख, निखिल मलके, ओंकार मोरे, भूषण पातोदकर यांच्यासह पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. नसरापूर प्रकरणामुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

 

 

 

 

 

Local ad 1