पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षण सोडत जाहीर झाली असून, बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही अनुभवी नेत्यांना या आरक्षण बदलामुळे नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर ही सोडत पार पडल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे आणि सरस्वती शेंडगे यांना यावेळी आरक्षणात साथ मिळालेली नाही. तर काही ठिकाणी सध्याचे व माजी नगरसेवक पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (PMC Election 2025 Ward Reservation List)
या निवडणुका चार-सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून, एकूण १६५ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. यामध्ये ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार-सदस्यीय तर आंबेगाव–कात्रज हा एकमेव पाच-सदस्यीय प्रभाग असेल. महिलांसाठी ८३, अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी २ आणि ओबीसींसाठी ४४ जागा आरक्षित आहेत.
आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. राजश्री काळे, सिद्धार्थ धेंडे, अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे आणि प्रकाश कदम यांच्यासमोर नव्या आव्हानांचे पर्व उभे आहे.
कसबा गणपती–केईएम प्रभागात पुन्हा एकदा भाजपचे गणेश बिडकर व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. येथे दोन सर्वसाधारण, एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण महिला जागा आहेत. भाजपचे बहुतेक नगरसेवक यावेळीही त्यांच्या प्रभागात टिकले आहेत. त्यामुळे महायुती एकत्र येईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा दोघेही वेगवेगळ्या प्रभागातून मैदानात उतरतील, अशी माहिती समोर आली आहे.
आरक्षणातील बदलांमुळे डॉ. धेंडे, राहुल भंडारे, आदित्य माळवे, सुनिता वाडेकर, राजश्री काळे, अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, अजय खेडेकर, सम्राट थोरात, पल्लवी जावळे आदींना नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत. या आरक्षण सोडतीनंतर पुण्याचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलले असून, काही गटांत आनंद तर काही ठिकाणी नाराजीचे वातावरण आहे. आगामी काही दिवसांत तिकीटवाटप आणि उमेदवारी निश्चितीवरून शहरात नव्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

